साफसफाई करणारा ‘मामा’ होणार प्राध्यापक
By admin | Published: September 10, 2016 01:16 AM2016-09-10T01:16:33+5:302016-09-10T01:16:33+5:30
साफसफाई करणारा मामा एका हातात झाडू, तर दुसऱ्या हातात पुस्तक घेतो आणि अहोरात्र अभ्यास करून सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन प्राध्यापक झाला
सोमेश्वरनगर : महाविद्यालयातील बाक उचलणारा, साफसफाई करणारा मामा एका हातात झाडू, तर दुसऱ्या हातात पुस्तक घेतो आणि अहोरात्र अभ्यास करून सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन प्राध्यापक झाला असून, विद्यार्थांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील शिपाई या पदावर काम करणाऱ्या अमोल संपतराव लकडे याची ही कहाणी. अमोल हा मूळचा निंबूत लकडेवस्ती येथील रहिवासी. घरी थोडीफार जमीन असून वडील संपतराव व आई रंजना हे शेती करतात. अमोल दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर २००८मध्ये सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयामध्ये शिपायाची नोकरी करू लागला. मात्र, घरची हलाखीची परिस्थिती अमोलला काही शांत बसू देत नव्हती. २०१०मध्ये अमोलने १७ नंबरचा फॉर्म भरून बारावीला प्रवेश घेतला. बारावी परीक्षा उतीर्ण झाल्यावर काकडे महाविद्यालयांतर्गतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहि:स्थ प्रवेश घेतला. बीएपर्यंतचा अभ्यास शिपायाची नोकरी संभाळत रात्रीचा केला. संरक्षणशास्त्र विषय घेऊन कला शाखेची पदवी संपादन केली. मात्र, त्याची शिक्षणाची जिद्द त्याला गप्प बसू देत नव्हती. एका हातात साफसफाईचा झाडू, तर दुसऱ्या हातात सेटचे पुस्तक घेतले.
त्याच्या या यशाने नवीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. याबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे, प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे, सचिव जयवंतराव घोरपडे, सतीश लकडे, शिवाजी नेवशे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. (वार्ताहर)
>दिवसा महाविद्यालयात काम, तर रात्रीच्या वेळी अभ्यास, असा दिनक्रम. आणि नुकत्याच २९ मे २०१६ रोजी पुणे येथे झालेल्या सेट परीक्षेत अमोलने ३५० पैकी १७८ गुण मिळवून सेट परीक्षेत यश संपादन केले.
मी ही परीक्षा पास होण्यामध्ये आई,
वडील, महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अमोलला काकडे महाविद्यालयातच प्राध्यापकाची नोकरी मिळणार आहे.
-अमोल लकडे