राज्यभरातील प्राध्यापक मंगळवारपासून बेमुदत संपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 07:53 PM2018-09-24T19:53:41+5:302018-09-24T20:11:56+5:30
राज्यभर शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने , ११ सप्टेंबर रोजी एक दिवसांचा संप आदी मार्गांनी आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाची शासनाने काहीच दखल न घेतल्याने त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयातीलप्राध्यापक विविध मागण्यांसाठी मंगळवार (दि. २५ सप्टेंबर) पासून बेमुदत संप पुकारला आहे. प्राध्यापकांच्या एमपुक्टो संघटनेने हा संप पुकारला आहे. महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन वाढवावे, अभ्यास मंडळांमधील नियुक्त्यांमध्ये झालेला गोंधळ दूर करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, थकित ७१ दिवसांचे वेतन मिळावे आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
एमपुक्टो संघटनेच्यावतीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. त्यांनी राज्यभर शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने , ११ सप्टेंबर रोजी एक दिवसांचा संप आदी मार्गांनी आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाची शासनाने काहीच दखल न घेतल्याने त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापक यामध्ये मोठया संख्येने सहभागी होतील असा विश्वास पुटाचे (पुणे युनिव्हसिटी टिचर्स असोसिएशन) अध्यक्ष एस. एम. राठोड यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान यापूर्वी संघटनेकडून ७१ दिवसांचा बेमुदत संप केला होता, त्यावेळी त्याला कमी पाठिंबा मिळाला होता. त्याचबरोबर शासनाने त्या ७१ दिवसांचे वेतन प्राध्यापकांना अदा केले नव्हते, त्यामुळे काही प्राध्यापक या आंदोलनापासून दूर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
......................
चर्चेसाठी बोलावले
एमपुक्टो संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभुमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी दुपारी ३ वाजता मंत्रालयात बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे व उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.