आॅनलाइन तपासणीतील तांत्रिक घोळामुळे प्राध्यापकांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:54 AM2017-07-21T01:54:50+5:302017-07-21T01:54:50+5:30

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे परीक्षांचे निकाल रखडले आणि थेट राज्यपाल विद्यासागर राव यांना या प्रकरणी लक्ष घालावे लागले.

Professors' tension due to online technical inspection | आॅनलाइन तपासणीतील तांत्रिक घोळामुळे प्राध्यापकांची दमछाक

आॅनलाइन तपासणीतील तांत्रिक घोळामुळे प्राध्यापकांची दमछाक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे परीक्षांचे निकाल रखडले आणि थेट राज्यपाल विद्यासागर राव यांना या प्रकरणी लक्ष घालावे लागले. राज्यपालांनी ३१ जुलैपूर्वी निकाल जाहीर करण्याची तंबी दिल्यानंतर विद्यापीठ प्रशासन कामाला लागल्याचे चित्र दिसत असले तरी पेपर तपासणीतील समस्या ‘जैसे थे’ आहेत. आॅनलाइन पेपर तपासणीसाठी आवश्यक सॉफ्टवेअर आणि तांत्रिक बाजूच लंगडी असल्याने पेपर तपासणाऱ्या प्राध्यापकांचा मोठा खोळंबा होत आहे.
राज्यपालांच्या निर्देशानंतर पेपर तपासणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी वॉररूमची निर्मिती करण्यात आली. शिवाय कुलगुरू संजय देशमुख यांनी बैठका घेऊन पेपर तपासणीची ‘स्ट्रॅटेजी’ ठरवली. शिवाय वेळेत काम पूर्ण करण्यासाठी भावनिक सादही घातली. त्यानुसार नव्याने सर्व यंत्रणा कामाला लागली. मात्र, आॅनलाइन पेपर तपासणीसाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर मुंबई विद्यापीठाचा भार पेलू शकत नसल्याची बाब उघड होत आहे. पेपर तपासणीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावण्याचे राज्यपालांनी आदेश दिले असतानाही त्यात कुचराई होत आहे. पेपर तपासणीसाठी पाच ते साडेपाच हजार प्राध्यापक कामावर येण्याची आवश्यकता असताना अवघे चार हजार प्राध्यापकच हे काम करत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे क्षमतेपेक्षा सुमारे दीड हजार प्राध्यापक कमी असतानाही पेपर तपासणीसाठीच्या सॉफ्टवेअरचा बोजवारा उडत आहे. चार हजार प्राध्यापकांचे कामही या सॉफ्टवेअरला झेपत नाही. मग, विद्यापीठातील सर्वच प्राध्यापकांनी काम हाती घेतले तर काय होईल, असा प्रश्न विचारला जात आहे.
पेपर तपासणीच्या कामाला लागलेल्या प्राध्यापकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आॅनलाइन पेपर तपासताना अनेकदा सर्व्हर डाऊन झाल्याच्या तक्रारी येत आहेत. शिवाय, उत्तरपत्रिका लोड होण्यासाठीही विलंब होत असल्याच्या तक्रारी प्राध्यापक करत आहेत. शिवाय, मध्येच काही तांत्रिक अडचण आल्यास ती सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाची माहिती असणारे कुशल मनुष्यबळही उपलब्ध नाही. त्यामुळे एखादी छोटी समस्या आली तरी दीड-दोन तासांचा खोळंबा होतो आणि पेपर तपासणीचे काम तसेच राहते, अशा तक्रारी काही प्राध्यापकांनी केल्या आहेत. आॅनलाइन पेपर तपासणीत तांत्रिकदृष्ट्या सॉफ्टवेअर कंपनीवरच अवलंबून राहावे लागत आहे. प्राध्यापकांना याबाबतीत प्रशिक्षित करणे अथवा सॉफ्टवेअर कंपनीला आवश्यक ती सर्व यंत्रणा उभी करणे बंधनकारक करणे, या दोन्ही बाबी विद्यापीठ प्रशासनाने केल्या नाहीत.

अभियांत्रिकीच्या धर्तीवर आॅनलाइन पेपर तपासणीचा घाट घालण्यात आला. मात्र, मुंबई विद्यापीठाचा पसारा लक्षात घेता सॉफ्टवेअर, सर्व्हरची क्षमता, तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी कुशल मनुष्यबळाची उपलब्धता आदी मूलभूत बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले.
प्रत्यक्ष पेपर तपासणीच्या कामाची सुरुवात करायला विलंब झालाच आहे, मात्र तांत्रिक बाजू जरी सांभाळली असती तरी हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले असते. एखादी नवीन योजना राबविताना त्यासाठी लागणारा गृहपाठ विद्यापीठ प्रशासनाने केला नाही.

Web Title: Professors' tension due to online technical inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.