पाच दिवसांत तीन कोटींचा नफा
By admin | Published: April 4, 2017 03:35 AM2017-04-04T03:35:27+5:302017-04-04T03:35:27+5:30
बीएस-३ प्रकारचे इंजीन असलेल्या वाहनांवरील बंदीनंतर किमतीत झालेल्या घसरणीमुळे नवी मुंबई आरटीओकडे नव्या ४९७ वाहनांची नोंद झाली
नवी मुंबई : बीएस-३ प्रकारचे इंजीन असलेल्या वाहनांवरील बंदीनंतर किमतीत झालेल्या घसरणीमुळे नवी मुंबई आरटीओकडे नव्या ४९७ वाहनांची नोंद झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई आरटीओच्या तिजोरीत साडेतीन कोटींची भर पडली आहे. यात २०२ दुचाकींचा समावेश आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार बीएस-३ प्रकारचे इंजीन असलेल्या वाहनांच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयानंतर संबंधित कंपन्यांनी उत्पादन संपवण्याच्या उद्देशाने वाहनांच्या किमतीमध्ये मोठी कपात केली आहे. या संधीचा फायदा घेत अनेकांनी नवे वाहन खरेदीचा मुहूर्त साधला आहे. अशा ४९७ वाहनांची नोंद नवी मुंबई आरटीओकडे मागील पाच दिवसांत झाली आहे. त्यामध्ये ११८ कारचा समावेश असून त्या युरो ४ इंजीनच्या आहेत. मात्र उर्वरित वाहने बीएस-३ प्रकारचे इंजीन असलेली आहेत. त्यात २०२ दुचाकी, ६३ ट्रक, २१ टेंपो, ७२ टॅक्सी व इतर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. वाहनांच्या नोंदणी शुल्कातून आरटीओच्या तिजोरीत एकूण ३ कोटी २७ लाख रुपयांची भर पडली आहे. पुढील काही दिवसांत त्यात भर पडण्याची शक्यता आहे.
वाहनांसाठी नवे मानक लागू झाल्यानंतर जुन्या मानकाची वाहने बंद केली जातात. परंतु जुन्या मानकाची देखील वाहने विक्रीला अनुमती मिळावी अशी वाहन कंपन्यांची मागणी आहे. याकरिता ते न्यायालयात गेले असता, जुन्या मानकाच्या वाहनांची विक्री बंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे केलेल्या उत्पादनाचे नुकसान टाळण्यासाठी त्यावर सूट देवून वाहने विकली जात आहेत. त्याचा पुरेपूर फायदा घेत अनेकांनी नव्या वाहनांची खरेदी केली आहे.