फायद्याची शेती, क्विंटलला एक लाख रुपये भाव; जामखेडच्या तरुणाचा दुष्काळी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 06:38 AM2023-04-09T06:38:06+5:302023-04-09T06:38:36+5:30

कृषी विकास प्रतिष्ठानच्या धान्य महोत्सवात जामखेडच्या एका शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेले चिया हे पीक चांगलेच भाव खात आहे.

Profitable farming Rs one lakh per quintal Drought experiment of Jamkhed youth | फायद्याची शेती, क्विंटलला एक लाख रुपये भाव; जामखेडच्या तरुणाचा दुष्काळी प्रयोग

फायद्याची शेती, क्विंटलला एक लाख रुपये भाव; जामखेडच्या तरुणाचा दुष्काळी प्रयोग

googlenewsNext

प्रशांत ननवरे

बारामती :

कृषी विकास प्रतिष्ठानच्या धान्य महोत्सवात जामखेडच्या एका शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेले चिया हे पीक चांगलेच भाव खात आहे. एक लाख रूपये क्विंटल दराने असणारे हे औषधी पीक महोत्सवाचे आकर्षण ठरले आहे. दुष्काळी भागासाठी ते वरदान आहे. चिया बियाणे या 
पिकाला सुपरफूड मानले जाते.  हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे. 

महेंद्र अजीनाथ बारस्कर (रा. वाघा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) असे या ३९ वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. बारस्कर यांचे शिक्षण दहावी नापास आहे. त्यांनी लावलेल्या पिकाने भल्याभल्यांना अचंबित केले आहे. भारतात उच्चांकी दर मिळणाऱ्या या पीक लागवडीचा त्यांनी प्रयोग यशस्वी केला आहे. हे खरीप हंगामात येणारे पीक आहे. १५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान पिकाची लागवड केली जाते. 

रक्तदाब, वजन कमी करणे, मधुमेह, हाडे मजबूत आदी आरोग्यदायी जीवनासाठी चियाचा उपयोग होतो. लागवडीपासून १२० दिवसांत हे पीक तोडणीसाठी तयार होते. तुळशीला येणाऱ्या मंजिरीप्रमाणे हे पीक आहे. लागवडीसाठी हलकी, भारी कोणतीही जमीन उपयुक्त आहे. कमी पाण्यात अगदी एक महिना हे पीक पाण्याशिवाय उभे राहते. 

या पिकाची एकरी पाच क्विंटल उत्पादन क्षमता आहे. मात्र, बारस्कर यांनी सेंद्रिय आणि शेणखताच्या वापरामुळे एकरी १० क्विंटल उत्पादन काढले आहे. 

उग्र वासामुळे जनावरेदेखील या पिकाला तोंड लावत नाहीत. या पिकाला कोणत्याही रासायनिक खताची अथवा फवारणीची गरज नाही. हे पीक कोणत्याही रोगाला बळी पडत नाही. रात्री २ ते ३ ग्रॅम चिया पाण्यात भिजवून सकाळी हे खाल्ल्यास याचा फायदा होतो. 
    - महेंद्र बारस्कर, जामखेड

Web Title: Profitable farming Rs one lakh per quintal Drought experiment of Jamkhed youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.