शिक्षणानेच प्रगती घडेल
By Admin | Published: September 20, 2016 01:40 AM2016-09-20T01:40:18+5:302016-09-20T01:40:50+5:30
मराठवाड्याची प्रगती करायची असेल, तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले.
कोथरूड : मराठवाड्याची प्रगती करायची असेल, तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले. मराठवाडा नागरी विकास संघ आयोजित मराठवाडा मुक्तिदिन स्मृती समारोहानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पवार बोलत होते. संजय जाधव, खासदार रवींंद्र गायकवाड, भाऊसाहेब जाधव, विनायक निम्हण व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी मराठवाडा भूषण पुरस्कार पशू व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना, तर मराठवाडा रत्न पुरस्कार शेतकरी नेते पाशा पटेल, पत्रकार गजेंद्र बडे, उद्योजक शरद तांदळे, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल दीपक नागरगोजे, तबलावादक अशोक मोरे यांना देण्यात आला.
पवार म्हणाले, की मराठवाड्याच्या मुक्तीसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांचे विस्मरण होता कामा नये. मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा शिक्का घालवण्यासाठी समाज शिक्षित करणे गरजेचे आहे. जलसंधारणाची कामे होणे गरजेचे आहे. आरक्षण हे सुधारण्याची संधी म्हणून आले, हे विसरता कामा नये. नाना वाघमारे, दिनकर चौधरी, शंकर वसेकर, चंद्रसेन स्वामी यांनी संयोजन केले. शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. दिनकर चौधरी यांनी आभार मानले. मूळचे मराठवाड्यातले पण व्यवसाय, शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या मराठवाडावासीयांनी या कार्यक्रमास मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)