दाभोलकरांच्या हत्येपूर्वीच ‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 01:43 AM2018-08-24T01:43:00+5:302018-08-24T06:47:11+5:30
सनातनवरील बंदीवरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
मुंबई : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येपूर्वीच तत्कालीन आघाडी सरकारने सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी दिली.
सनातनवरील बंदीवरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावर सविस्तर स्पष्टीकरण देणारे निवेदन चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिले आहे. २००८ साली ठाणे येथे झालेल्या बॉम्बस्फोटात सनातन संस्थेच्या काही कार्यकर्त्यांवर दोषारोप सिद्ध होवून न्यायालयाने आरोपींना १४ वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने या संस्थेबद्दल राज्याला अहवाल सादर केला. संस्थेचा इतिहास, एटीएसचा अहवाल आणि पुराव्यांचा साकल्याने विचार करून ११ एप्रिल २०११ रोजी तत्कालीन आघाडी सरकारने ‘सनातन’ वर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता, असे चव्हाण म्हणाले.
बंदीची भूमिका हायकोर्टातही कायम
सप्टेंबर २०११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारला प्रतिवादी करण्यात आले होते. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने उच्च न्यायालयासमोर सनातन वर बंदी घालण्याची भूमिका कायम ठेवली होती.