उच्चभ्रू वस्त्यांमध्ये पाहणीस मज्जाव; महापालिकेची तक्रार
By admin | Published: November 6, 2014 04:07 AM2014-11-06T04:07:39+5:302014-11-06T04:07:39+5:30
डेंगीच्या डासांची पैदास ही घरात स्वच्छ पाण्यात मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे डेंगी रोखण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा आहे
मुंबई : डेंगीच्या डासांची पैदास ही घरात स्वच्छ पाण्यात मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे डेंगी रोखण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये अनेक वेळा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेटवरच अडवले जाते. त्यामुळे अशा परिसरांमध्ये तपासणी करणे शक्य होत नसल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले.
मुंबईतील उच्चभ्रू विभागांमध्ये, सोसयट्यांमध्ये आम्हाला सहकार्य केले जात नाही. आणि याच भागांमध्ये ५१ टक्के डासांची पैदास झाल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली. पावसाळा संपून एक महिना उलटला आहे, तरीही हिवाळा अजूनही सुरू झालेला नाही. हे वातावरण डासांची पैदास होण्यास पोषक असल्यामुळे डेंगीच्या डासांची पैदास अजूनही होत आहे. डेंगी रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. रेडिओवरून जिंगल्सद्वारे, वृत्तपत्रातून जाहिरातीद्वारे, टीव्हीवरील जाहिरातीतून केंद्र सरकारही जनजागृती करीत आहे, असे देशमुख यांनी सांगितले. डेंगीचा ताप आल्यावर रुग्ण स्थिर असतानाही त्याच्या प्लेटलेट्स कमी होतात. हे कशामुळे होते, विषाणूंमध्ये काही बदल झाले आहेत का, याचा अभ्यास करण्यासाठी रक्त चाचण्या केल्या जात आहेत. या अभ्यासामुळे अजून काही गोष्टी स्पष्ट होण्यास मदत होईल, असे डॉ. सुहासिनी नागदा यांनी सांगितले.
डेंगी झालेल्या रुग्णांच्या घरी आणि आजूबाजूच्या घरांमध्ये देखील डासांची पैदास होते आहे का, याची तपासणी केली जाते. ८५ टक्के वेळा डेंगी झालेल्या रुग्णाच्या घरी किंवा बाजूच्या घरातच डेंगीच्या डासांची पैदास झाल्याचे आढळले आहे.
आॅक्टोबर २०१४ मध्ये डेंगीचे ३ हजार संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर २०१४ मध्ये आॅक्टोबर महिन्यापर्यंत ६५९ डेंगीचे रुग्ण आढळून आले आहेत. २०१३ या वर्षात डेंगीचे एकूण ९२७ रुग्ण आढळून आले होते.
महापालिकेचे एकूण ९०० कर्मचारी हे डेंगी, मलेरिया रोखण्यासाठी कार्यरत आहेत. प्रत्येक कर्मचारी दिवसाला ४५ ते ५० घरांची पाहणी करतो. दर महिन्याला ७ लाख घरांची पाहणी केली जाते. सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यांमध्ये एकूण ९ ते १० लाख घरांची पाहणी करण्यात आली आहे. महापालिकेने आतापर्यंत १३ हजार २४७ जणांना नोटीस पाठविली आहे. यापैकी ३४४ जणांवर खटला भरण्यात आला आहे.