हत्येच्या तपासातील दिरंगाईचा निषेध
By Admin | Published: August 19, 2016 01:21 AM2016-08-19T01:21:24+5:302016-08-19T01:21:24+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्ट रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र अजूनही त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. एम.एम. कलबुर्गी यांचे
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० आॅगस्ट रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र अजूनही त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. एम.एम. कलबुर्गी यांचे मारेकरीही फरार आहेत. या तपासातील दिरंगाईच्या निषेधार्थ २० आॅगस्ट रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व शाखा जिल्हाधिकारी व तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळी निवेदने पाठवणार आहेत. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी ही माहिती दिली.
नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासातील दिरंगाई क्लेषदायक आहे. हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता वीरेंद्र तावडे याला अटक होऊनही तपासात अपेक्षित प्रगती झालेली नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणा एन. आय. ए.च्या उदासीनतेमुळे तपासाला वेग आलेला नाही. पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने वीरेंद्र तावडे याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेले नाही. या पार्श्वभूमीवर तपासातील दिरंगाईचा निषेध म्हणून काळी निवेदने पाठवण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारवंतांच्या हत्येला कारणीभूत ठरणाऱ्या प्रवृत्तीविषयी ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा अंनिसने व्यक्त केली आहे. हिंसेचे समर्थन करणाऱ्या सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समितीवर सरकार कारवाई का करत नाही, असा सवालही अंनिसने उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)
हिंसा के खिलाफ, मानवता की ओर
हिंसेला विरोध करण्यासाठी आणि हिंसक वर्तनाची कारणीमीमांसा करण्याच्या हेतूने अंनिसतर्फे राज्यात ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ हे राष्ट्रीय प्रबोधन अभियान राबवण्यात येत आहे.
या अंतर्गत ३० जिल्ह्यांत ‘हिंसेला नकार व मानवतेचा स्वीकार’ या विषयावर ‘युवा संकल्प परिषद’ घेण्यात येत आहेत. २० आॅगस्ट रोजी ठिकठिकाणी होणाऱ्या निषेध कार्यक्रमांतून हा संकल्प सामूहिकरीत्या राबवण्यात येणार आहे.