कचरा टाकण्यास हरित लवादाची मनाई
By admin | Published: June 11, 2016 01:31 AM2016-06-11T01:31:23+5:302016-06-11T01:31:23+5:30
सासवड नगरपालिकेचा जमा होणारा कचरा कुंभारवळण येथे टाकण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने तूर्तास २९ जुलैपर्यंत मनाई केली आहे.
सासवड : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या अटींची पूर्तता होईपर्यंत सासवड नगरपालिकेचा जमा होणारा कचरा कुंभारवळण येथे टाकण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने तूर्तास २९ जुलैपर्यंत मनाई केली आहे. नागरिकांना कचरा प्रदूषणामुळे आरोग्याचा त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश आरोग्य खात्याला देण्यात आलेले आहेत.
पुरंदर हायस्कूलसमोर कोणतीही प्रक्रिया न करता सासवड नगरपालिका उघड्यावर कचरा टाकत होती. त्याविरोधात डॉ. उदयकुमार जगताप यांनी केलेल्या याचिकेवरही निर्णय देत नगरपालिकेने उघड्यावर कचरा टाकू नये, असे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे नगर परिषदेने कुंभारवळण परिसरात शासकीय जागा घेऊन, प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता घेऊन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा केला होता व न्यायालयाचे आदेशाने प्रक्रिया सुरू केली होती.
कचरा प्रकल्पाविरोधात एखतपूर-मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण, उदाचीवाडी व खळद येथील ग्रामस्थ आणि पुरंदर पंचायत समिती सदस्य दत्ता झुरंगे, कुंभारवळणचे सरपंच अमोल कामथे, अॅड. श्रीकांत ताम्हाणे, महादेव टिळेकर, बाळासाहेब झुरंगे, शरद टिळेकर यांनी न्यायाधिकरणात धाव घेतली होती.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयनुसार नगरपालिका कार्यवाही करणार आहे. त्यानंतर पुढील तारखेला तसा अहवाल सादर करून कचरा प्रक्रिया करण्यास परवानगी मागणार असल्याचे मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले.
>जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी, ‘सासवडमधील काचऱ्यावर सासवड परिसरातच प्रक्रिया करावी. सासवड येथील वाघ डोंगर परिसरात नगरपालिकेची पाण्याची टाकी आहे तेथील शिल्लक जागेत प्रक्रिया केंद्र उभारावे. त्यासाठी आपण शासनाकडून सर्र्व निधी उपलब्ध करून देऊ. याबाबत बैठक घेऊ,’ असे सुचविल्याचे नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी सांगितले. पाण्याच्या टाकीजवळील जागा प्रक्रिया केंद्रास अपुरी आहे. शासनाकडून शिवतारे यांनी जागा मिळवून द्यावी. नगरपालिका प्रक्रिया केंद्र उभारेल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पुणे शहरातील प्रक्रिया केंद्राची पाहणी करावी व तशी प्रक्रिया केंद्रे सासवडमध्ये करावीत, असेही शिवतारे यांनी सुचविले होते. नगराध्यक्षांनीआपण पुणे येथे जाऊन यापूर्वीच पाहणी केली असल्याचे सांगितले.