‘जादा काम’ करून निषेध
By Admin | Published: November 3, 2015 03:16 AM2015-11-03T03:16:28+5:302015-11-03T03:16:28+5:30
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी काम बंद करणे, संप करणे हे तर सरकारी कर्मचाऱ्यांचे नित्याचेच हत्यार असते. सोमवारी मात्र त्यांनी आंदोलनात अनोखी ‘गांधीगिरी’ दाखविली.
मुंबई : प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी काम बंद करणे, संप करणे हे तर सरकारी कर्मचाऱ्यांचे नित्याचेच हत्यार असते. सोमवारी मात्र त्यांनी आंदोलनात अनोखी ‘गांधीगिरी’ दाखविली. मुंबईतील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी कामकाजाची वेळ संपल्यानंतरही तब्बल दोन तास ‘जादा काम’ करीत अनोखे आंदोलन केले. सर्व कर्मचारी आपापल्या कामाच्या ठिकाणी थांबून राहिले.
राज्य शासनाने आतातरी दखल घेऊन मागण्यांची पूर्तता करावी. अन्यथा यापुढे आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढविली जाईल, असा इशारा मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश बकशेट्टी यांनी दिला. पाच दिवसांचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीचे वय ६० करावे, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता व त्याची थकबाकी मिळण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून मागणी होत आहे. त्यासाठी २ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा संप केला होता.
मात्र राज्य सरकार त्याची दखल घेत नसल्याने २ नोव्हेंबरला गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय राज्य संघटनेने घेतला. त्यानुसार सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यानंतरही शासकीय कार्यालयातील कर्मचारी थांबून राहिले.
कोषाध्यक्ष गणेश बकशेट्टी, पोलीस आयुक्तालय कर्मचारी संघटनेचे चिटणीस गोकूळ देवरे व अन्य पदाधिकारी हे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर थांबून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना आंदोलनाचे महत्त्व पटवून देत पुन्हा कार्यालयात पाठवत होते. रात्री ८च्या सुमारास सर्व जण कार्यालयातून बाहेर पडले. संपूर्ण राज्यात आज
अशा पद्धतीने शासनाचा निषेध करण्यात आल्याचे बकशेट्टी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)