विवेक मूर्तींचे नामांकन रोखण्याच्या कृतीचा निषेध
By admin | Published: May 9, 2014 11:34 PM2014-05-09T23:34:36+5:302014-05-09T23:34:36+5:30
अमेरिकी सर्जन जनरल अर्थात महाशल्यचिकित्सक या महत्त्वाच्या पदावर अनिवासी भारतीय डॉक्टर विवेक मूर्ती यांचे नामांकन रोखण्यासाठी अमेरिकी संसद सदस्यांचा एक गट प्रयत्नशील आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकी सर्जन जनरल अर्थात महाशल्यचिकित्सक या महत्त्वाच्या पदावर अनिवासी भारतीय डॉक्टर विवेक मूर्ती यांचे नामांकन रोखण्यासाठी अमेरिकी संसद सदस्यांचा एक गट प्रयत्नशील आहे. संसद सदस्यांवर दबाव आणण्याच्या बंदूक लॉबीच्या प्रयत्नांचा वैद्यक क्षेत्रातील एका ख्यातनाम नियतकालिकाने निषेध केला आहे. या कृतीवर ‘राजकीय ब्लॅकमेलिंग’ची नवी पद्धत अशा शब्दांत टीका केली. ‘न्यू इंग्लंड मेडिकल जर्नल’ने आपल्या ताज्या अंकात मूर्ती यांचे नामांकन रोखण्याच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. यात म्हटले की, महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय रायफल असोसिएशन यासारख्या विशेष हितासाठी काम करणार्या संघटनांना देशाच्या सर्वोच्च डॉक्टरच्या नियुक्तीसाठी नकाराधिकार असला पाहिजे का? हा विचारच अस्वीकारार्ह आहे. अमेरिकी सिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर बोस्टनमध्ये राहणारे ३६ वर्षीय मूर्ती हे पहिले भारतीय- अमेरिकी आणि उच्च पदावर जाणारे सर्वांत तरुण अधिकारी ठरतील. सिनेटमध्ये १० डेमॉक्रॅटिक सदस्यांनी बंदुकीवरील नियंत्रणाशी संबंधित आपल्या खासगी विचारांच्या मुद्यावरून अक्षरश: मूर्ती यांच्या नामांकनाविरोधात मत देण्याची तयारी चालवली होती, असा आरोप या संपादकीयात केला आहे. (वृत्तसंस्था)
रायफल संघटनेच्या नेतृत्वाखाली बंदूक लॉबी मूर्ती यांच्या नामांकनास विरोध चालविला आहे. कारण भारतीय वंशाच्या डॉक्टरने अमेरिकेतील बंदूक संस्कृतीविरोधात ओबामांच्या सुरात सूर मिसळला आहे. रायफल संघटनेच्या लॉबींवरून आमच्या लोकप्रतिनिधींनी आपली किती ताकद अशा संघटनांना सोपविली आहे, हे दिसून येते. अमेरिकेत दरवर्षी बंदुकीने ३०,००० जणांचा बळी जातो. हा आकडा पाहता मूर्ती यांनी बंदूक संस्कृतीस केलेला विरोध अतार्किक असल्याचे दिसत नाही, अशा शब्दांत मूर्ती यांचे समर्थन या संपादकीयात करण्यात आले आहे.