प्रकल्प अहवाल ३ महिन्यांत देणार
By admin | Published: May 17, 2016 03:30 AM2016-05-17T03:30:50+5:302016-05-17T03:30:50+5:30
अंधेरी ते विरार टप्पा आणि सीएसटी ते पनवेल एलिव्हेटेड कॉरीडोर प्रकल्पाचा सुधारित अहवालावर एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन)काम केले जात आहे.
मुंबई : चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड प्रकल्पांतील अंधेरी ते विरार टप्पा आणि सीएसटी ते पनवेल एलिव्हेटेड कॉरीडोर प्रकल्पाचा सुधारित अहवालावर एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन)काम केले जात आहे. दोन्ही प्रकल्पांचे अहवाल येत्या तीन महिन्यात पूर्ण करुन रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारला सादर केले जातील, अशी माहीती एमआरव्हीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
नुकतेच मुंबई दौऱ्यावर आलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यावेळी चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहीती देण्यात आली. यात प्रथम वांद्रे ते विरार आणि त्यानंतर वांद्रे ते चर्चगेट प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर सीएसटी ते पनवेल रेल्वे आणि रोड असा मल्टिमोडल एलिव्हेटेड कॉरीडोरही बांधण्यात येणार असून त्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली होती. दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्प एमआरव्हीसीच्या अखत्यारित येत असल्याने त्यांनी या प्रकल्पांचे सुधारित अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारण तीन महिन्यात हे अहवाल बनविले जातील आणि त्यानंतर रेल्वे मंत्रालय तसेच राज्य सरकारपुढे सादर केले जातील, अशी माहीती एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली. चार ते पाच वर्षापूर्वी दोन्ही प्रकल्पांचे सर्व्हेक्षण झाले होते. मात्र त्यात बदल असल्याने सुधारित अहवाल तयार करणार असल्याचे सांगण्यात आले.