बेस्ट कृती आराखडा लांबणीवर
By admin | Published: April 25, 2017 01:56 AM2017-04-25T01:56:02+5:302017-04-25T01:56:02+5:30
आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी महापालिकेने हात पुढे केल्यामुळे बेस्टला काही प्रमाणात का होईना आशा निर्माण झाली होती.
मुंबई : आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी महापालिकेने हात पुढे केल्यामुळे बेस्टला काही प्रमाणात का होईना आशा निर्माण झाली होती. त्यानुसार कृती आराखडाही तयार झाला. मात्र यावर अंमल होण्याआधीच बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची बदली झाली. याचा फटका बेस्ट बचाव मोहिमेला बसणार असून, कृती आराखडा लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
बेस्ट उपक्रम कर्जात बुडाले असल्याने पालक संस्था म्हणून महापालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र महापालिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक साहाय्याचा विनियोग कसा होणार? अर्थात बेस्टचा डोलारा कसा सावरणार, याचा आराखडा तयार करण्याची
अट आयुक्त अजय मेहता यांनी घातली. त्यानुसार सखोल अभ्यासानंतर महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी कृती आराखडा तयार करून आयुक्तांकडे सादर केला होता.
या आराखड्यात बस भाडेवाढ, प्रवाशांना व अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या काही सेवा रद्द व सवलतींमध्ये कपात सुचविण्यात आली आहे. या कृती आराखड्याचे पहिले पाऊल म्हणून तुटीत असलेल्या २६६ वातानुकूलित बसगाड्या गेल्या सोमवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवीन वातानुकूलित मिडी बस खरेदी करणे आदी योजना तयार आहेत.
मात्र गेल्या तीन वर्षांपासून बेस्टच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास असलेल्या महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांच्या बदलीमुळे कृती आराखड्यावर पुढील कार्यवाही तूर्तास लांबणीवर पडली आहे. नवीन महाव्यवस्थापकांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर या आराखड्याचा अभ्यास करून त्यात काही सुधारणा अथवा सूचना करणे अपेक्षित आहे. यामुळे हा आराखडा लांबणीवर पडून याचा परिणाम बेस्टच्या महसुलास बसेल, अशी भीती अधिकारी खाजगीत व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)
भाजपाकडून शिवसेनेची कोंडी-
बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावर सुरेंद्र बागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती केल्यामुळे त्यांचेच नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपाने ही खेळी केल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. दरम्यान, बेस्ट उपक्रमाला महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या कर्जाचा व्याजदर दहा टक्क्यांवरून पाच टक्के करण्याची सूचना नगरसेवकांनी केली आहे. मात्र बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी कर्ज देण्यात आले तरी व्याजदरामध्ये कपात करणे शक्य नसल्याचा अभिप्राय महापालिकेने दिला आहे.
भाडेवाढ केल्यास उत्पन्नात भर-
किमान बस भाडे ८ रुपयांवरून १२ रुपये करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार किमान भाडे १० रुपये केल्यास ११० कोटी रुपये आणि १२ रुपये केल्यास २०० कोटींची उत्पन्नात भर पडणार आहे.
वातानुकूलित २७ मार्ग बंद
नुकसानीत असलेल्या बसमार्गांपैकी वातानुकूलित २७ बसमार्ग बंद करण्यात आले आहेत. पालिका आयुक्तांना सादर केलेल्या कृती आराखड्यानुसार हे बसमार्ग बंद केल्यानंतर आता कामगारांचा महागाई भत्ता गोठवण्यापासून विविध भत्त्यांना कात्री लावण्यात येणार आहे. याबरोबरच मासिक बसपासमध्ये वाढ, विद्यार्थी आणि पत्रकारांना दिलेल्या सवलती रद्द करून त्यात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महापालिकेकडून बेस्ट दिलासा -
केंद्र आणि राज्य सरकार व महापालिकेनेच बेस्टचे वीज बिलापोटी ३८ कोटी रुपये थकविले असल्याचे समोर आले आहे. तर सर्वसामान्य जनतेकडूनही बेस्टचे १० कोटी रुपये थकले आहेत. ही बाब उघडकीस आल्यानंतर आयुक्त अजय मेहता यांनी याची गंभीर दखल घेत महापालिकेच्या कार्यालयांना बेस्ट उपक्रमाची थकबाकी तत्काळ भरण्याचे आदेश आज दिले. त्यामुळे बेस्टला आधार मिळाला आहे.
अशी आहे थकबाकी-
केंद्र सरकार : १७ कार्यालये - ३ कोटी १२ लाख रुपये
महापालिका : ७१ कार्यालये - ११ कोटी ३८ लाख रुपये
राज्य सरकार : १५४ कार्यालये व वसाहती - २३ कोटी ८७ लाख रुपये
इतर ग्राहक : ५७ मोठे ग्राहक १० कोटी ३७ लाख रुपये
वीजपुरवठा खंडित केल्यानंतरची थकबाकी
केंद्र सरकार : ३ कार्यालये, ५० लाख
महापालिका : ९ कार्यालये, १ कोटी ६ लाख
राज्य सरकार : ७ कार्यालये, १ कोटी १८ लाख
इतर ग्राहक : ३२० ग्राहक, ३० कोटी ८४ लाख