मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर
By admin | Published: June 24, 2016 05:07 AM2016-06-24T05:07:07+5:302016-06-24T05:07:07+5:30
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात होण्याची शक्यता मावळली आहे. आता विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
यदु जोशी, मुंबई
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात होण्याची शक्यता मावळली आहे. आता विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
लांबलेला पाऊस, मुख्यमंत्र्यांची विस्ताराबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी अद्याप बाकी असलेली चर्चा, शिवसेनेशीही न झालेली चर्चा या पार्श्वभूमीवर विस्तार लांबणीवर पडला आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत आहे. नवीन मंत्र्यांना आपापल्या खात्याचे कामकाज समजून घेण्यासाठी त्यामुळे कमीच दिवस मिळतील, असे दिसते. मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या आमदारांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र, नव्या मंत्र्यांची नावे ठरविण्यासाठी मुख्यमंत्री हे पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी नेत्यांशी पुन्हा चर्चा करणार आहेत.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या परदेशात असून, पुढच्या आठवड्यात परतणार आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांचा विस्तारात समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री त्यांच्याशीही चर्चा करतील. उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या सुवर्णमहोत्सवी मेळाव्यात पंतप्रधानांवर टीका करताना मुख्यमंत्री फडणवीस यांचे मात्र कौतुक केले होते. सरकार पाडण्याची भूमिका शिवसेना घेणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले होते. ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांशी असलेले स्नेहाचे संबंध लक्षात घेता, विस्तारात सेना सहभागी होण्याबाबत अडचण येणार नाही, असे मानले जाते.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्ष या भाजपाच्या लहान मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही, या बाबतची अनिश्चितता कायम आहे. आ. महादेव जानकर, खा.राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत भाजपा नेत्यांच्या अलीकडे गाठीभेटी घेऊन मंत्रिपदाची गळ घातल्याचे सांगितले जाते.