आघाडीचा निर्णय लांबणीवर
By admin | Published: January 20, 2017 04:14 AM2017-01-20T04:14:57+5:302017-01-20T04:14:57+5:30
मागील निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी करुन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता.
उल्हासनगर : मागील निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी करुन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीतही आघाडी व्हावी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र ओमी कलानींच्या निर्णयाभोवती राष्ट्रवादी गुरफटल्याने आघाडीची बोलणी लांबणीवर पडली आहे. ओमी टीमच्या हट्टामुळे आघाडीची बोलणीही रखडली आहे. ओमी कलानींचा भाजपा प्रवेश टळला तर राष्ट्रवादी ओमी टीमला घेऊन स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असून काँग्रेसलाही स्वबळावरच लढावे लागणार आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसने उमेदवारांची तयारीही सुरु केली आहे.
निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असली तरी पक्षांतराचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यातच आहे. ओमी कलानी भाजपाच्या संपर्कात असल्याचे दिसत असले तरी भाजपाने अद्याप त्यांना हिरवा कंदील न दाखविल्याने ओमी टीम ही राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली शहरभर प्रचाराचे काम करत आहेत. ओमींचा निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीचा निर्णयही लांबणीवर पडला आहे. ओमी टीमला काँग्रेससोबत निवडणूक लढविण्यात रस नसल्याचे स्पष्ट असले तरी काँग्रेसने आघाडीचा धर्म म्हणून राष्ट्रवादीकडे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. तर दुसरीकडे ओमीच्या हट्टामुळे राष्ट्रवादीचे नेतेही आघाडीच्या बोलणीसाठी पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. ओमींचा भाजपा प्रवेश टळावा ही इच्छा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची आहे.
ओमी टीमने शहरात चांगला दबदबा निर्माण केल्याने ओमी ज्या पक्षात राहतील त्याला सत्तेची गणिते सोपी होणार आहे. भाजपाने ओमीचा स्वीकार केल्यास उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी ही नावापुरती राहणार हे निश्चित. अशा पडतीच्या काळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित येणे शक्य होणार आहे. ओमी टीमला काँग्रेसची अॅलर्जी असल्याने नवीन समीकरणे जुळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारीही काँग्रेसने ठेवली आहे.
>चांगले उमेदवार दिल्यास मतदार पक्षासोबतच
काँग्रेसच्या नगरसेवकांचा आकडा जरी कमी असला तरी काँग्रेसच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग उल्हासनगरमध्ये आहे. मतदारांसमोर चांगले उमेदवार दिल्यास मतदार काँग्रेस पक्षासोबत राहतील असा आमचा ठाम विश्वास आहे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत कुठेच कमी पडणार नाही. मतदारांपुढे एक पर्याय म्हणून ठामपणे काँग्रेसचे उमेदवार जातील.
- निलेश पेंढारी, प्रभारी- उल्हासनगर ओमी भाजपात गेल्यास राष्ट्रवादीला उमेदवार मिळणे अवघड जाणार आहे. ही नामुष्की टाळण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी उल्हासनगरवर लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादीचे सर्व गणित हे कलानी कुटुंबियांभोवती रेंगाळत आहे. तर काँग्रेसचे सर्व गणित हे इतर पक्षातील नाराज उमेदवारांभोेवती फिरत आहे.