धनगर आरक्षण लांबणीवर
By admin | Published: March 15, 2016 01:44 AM2016-03-15T01:44:58+5:302016-03-15T01:44:58+5:30
धनगर ही भटकी जमात आणि ओरॉन, धनगड या अनुसूचित जमातीबाबत अभ्यासपूर्ण संशोधनाचे काम टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस करीत असून, याबाबतचा अंतिम अहवाल
मुंबई : धनगर ही भटकी जमात आणि ओरॉन, धनगड या अनुसूचित जमातीबाबत अभ्यासपूर्ण संशोधनाचे काम टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस करीत असून, याबाबतचा अंतिम अहवाल डिसेंबर २०१७ पर्यंत शासनास सादर करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी आज विधानसभेत सांगितले. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील निर्णय किमान डिसेंबर २०१७ पर्यंत होणार नसल्याचे स्पष्ट झाले.
पहिल्या टप्प्यात टाटा इन्स्टिट्यूट विविध शासकीय कार्यालये, संस्था, शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन प्राथमिक माहिती घेत आहे. धनगर समाजाबाबत साहित्य व पुस्तके प्राप्त करून संशोधनाचे नियोजन करीत आहे.
दोन टप्प्यांत संशोधन पूर्ण करून इन्स्टिट्यूट शासनास अहवाल सादर करेल, असे सावरा यांनी लेखी उत्तरात सांगितले. या बाबतचा प्रश्न जितेंद्र आव्हाड, किसन कथोरे, राहुल बोंद्रे आदी सदस्यांनी विचारला होता. (विशेष प्रतिनिधी)