रविवार ठरला प्रचारवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2017 04:21 AM2017-02-13T04:21:54+5:302017-02-13T04:21:54+5:30
मुंबईसह १० महापालिका आणि पहिल्या टप्प्यातील १५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार आता टिपेवर गेला असून, सभा, प्रचार फेऱ्या, कॉर्नर बैठका आणि गाठीभेटींनी निवडणुकीचा उत्साह आणखी शिगेला
मुंबई : मुंबईसह १० महापालिका आणि पहिल्या टप्प्यातील १५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा प्रचार आता टिपेवर गेला असून, सभा, प्रचार फेऱ्या, कॉर्नर बैठका आणि गाठीभेटींनी निवडणुकीचा उत्साह आणखी शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या जुगलबंदीने प्रचाराचा टेम्पो चांगलाच तापला आहे.
मुंबईच्या प्रचारसभांतून शिवसेनेने वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी रविवारी जुहू येथील सभेत चोख उत्तर दिले. ते म्हणाले की, १५-२० वर्षे सत्ता भोगून एकही विकासकाम लोकांसमोर मांडू शकत नाहीयेत. म्हणून शिवराळ भाषा वापरली जात आहे.
मुंबईतील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थेट लक्ष्य करीत टीका केली. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे काँग्रेसविरोधात लढले; पण आज काँग्रेसचे कौतुक करताना उद्धव ठाकरे थकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिंमत दाखवली. आपल्या गुहेत कोणीही शेर असतो एकदा सर्जिकल स्ट्राईक करून पाहा, असा टोलाहीमुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लगावला.
नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड आदी तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवाराच्या प्रचारार्थ नरसीफाटा (ता. नायगाव) येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली़ मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना मराठा आरक्षणाचे काय झाले म्हणून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भर सभेत मुख्यमंत्र्यांना जाब विचारला़ घोषणाबाजी करणाऱ्या गुलाबराव जाधव, दशरथ कपाटे, सतीश पाटील पवार, किरण पाटील दिघळीकर या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शिवसेनेच्या मोदीद्वेषामागे नोटाबंदीचे दुखणे : मुख्यमंत्री
मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार म्हणजे कुस्तीचा आखाडा बनवून टाकला आहे. मुंबईच्या निवडणुकीत पालिकेच्या विकासकामांचा पाढा वाचण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे.
युती तुटली म्हणून मोदींवर टीका केली जात नाहीये; तर, भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी केल्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे बिथरले आहेत.
ज्या भ्रष्ट नेत्यांना या निर्णयाचा त्रास झाला तेच विरोधाची भाषा करत असून, अशा भ्रष्टाचाऱ्यांच्या रांगेत उभे राहण्याची वेळ का आली, याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी जुहू येथील प्रचारसभेत केली.
बुलेट ट्रेन काँग्रेसची उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या टीकेला गोरेगावच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, वाघाशी खेळण्याचा प्रयत्न करू नका, कधी पंजा मारेल ते समजणारही नाही. आम्ही मुंबईत शेर आहोत आणि बाहेरपण आम्हीच शेर आहोत.
कुत्र्याची छत्री आणि सेनेचं छत्र यातील फरक लोकांना चांगला कळतो. वाघाचे बच्चे कसे असतात? हे भाजपाला कळलेलं नाही. अशोकस्तंभावर अजून सिंहाचंच चित्र आहे, मोदींचं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणारे मोदी आणि मुख्यमंत्र्यांना त्यांचेच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी चपराक लावली आहे. प्रभूंनी कबूल केलंय की, बुलेट ट्रेनचा प्रस्ताव काँग्रेस सरकारच्या काळातील आहे, असे उद्धव म्हणाले. मुख्यमंत्र्यांसारखा दगडाच्या हृदयाचा मी नाही. होय, मला नोटाबंदीचा फटका बसला, कारण रांगेत २०० लोकांचा मृत्यू झाल्याचा मला त्रास झाला.
मला नोटाबंदीचा फटका किती बसला आहे, हे तुम्हाला २३ तारखेला कळेल, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.
उमेदवाराला मारहाण, आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल
भुसावळ (जि.जळगाव) : साकेगाव-कंडारी गटातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर आमले यांना मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्यासह पाच जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला़
सरकारमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या: अशोक चव्हाण
सगरोळी (जि़नांदेड) : सगरोळी येथील सभेत बोलतांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. दररोज नवनवीन घोषणा करून जनतेची फसवणूक सुरू आहे़ मोदींच्या अनेक जाचक निर्णयामुळे त्रस्त होवून सुमारे ९ हजारांवर शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे़, असा आरोपही चव्हाण यांनी केला.
ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारली
पुणे : एमआयएम उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुुद्दीन ओवैसी यांच्या मंगळवारी होणाऱ्या सभेला खडक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कासेवाडी वसाहतीमध्ये ओवैसी यांची सभा होणार होती. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.