ठाणे बँकेत पदोन्नतीत गैरव्यवहार?
By admin | Published: July 7, 2017 04:01 AM2017-07-07T04:01:18+5:302017-07-07T04:01:18+5:30
तब्बल सात हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये गैरव्यवहार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : तब्बल सात हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी पालघरच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, बँकेत सर्वपक्षीय संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा एककलमी कार्यक्रम राबवून १४० कर्मचाऱ्यांची पदोन्नती केली. यात सहकार आयुक्त आणि मंत्रीमहोदयांच्या नावाखाली प्रत्येक कर्मचाऱ्याकडून पाच लाखांची लाच घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. यात संचालक दोन ते तीन, अध्यक्ष पाच, उपाध्यक्ष पाच, लोकप्रतिनिधी तथा आजी माजी दोन अशा जागा वाटप करून पैसे महाव्यवस्थापकांकडे जमा ेकरावे. या पदोन्नती रद्द करून यातील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत १०१ कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संवर्गातील पदोन्नती या रीतसर मुलाखती घेऊन तसेच पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करूनच केल्या आहेत. बँकेच्या बाहेरील काही राजकीय आकसापोटी हे तथ्यहीन आरोप केले आहेत. त्यामुळे या आरोपांमध्ये कोणतीही तथ्यता नाही.
- राजेंद्र पाटील, अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ठाणे