प्रचारफेरी
By admin | Published: February 14, 2017 01:02 AM2017-02-14T01:02:58+5:302017-02-14T01:02:58+5:30
मनसेचे प्रमुख राज ठाकरे अजूनही प्रचारात पूर्णपणे उतरलेले नाहीत. खास ठाकरे शैलीतील त्यांच्या भाषणाची तोफ अद्याप धडाडलेली नाही.
मुख्यमंत्र्यांच्या आईचे मन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या प्रचारात प्रचंड व्यग्र आहेत. रोज झोपायला पहाटे ३-४ वाजतात. पुन्हा सकाळी ८ वाजता वर्षावरून प्रचारासाठी बाहेर पडतात. त्यांच्या या प्रचंड दगदगीची वर्षा बंगल्यावर दोन व्यक्तींना तेवढीच काळजी असते. पती, कन्या दिविजा, बँक आणि सोशल कमिटमेंटस् एकाच वेळी सांभाळण्याची कसरत अमृतावहिनी करत असतात. आई सरिता या राजकीय घडामोडींबद्दल नेहमीच जागृत राहत आल्या आहेत. त्यांचे पती गंगाधरराव फडणवीस हे राजकारणातील एक वादळच होते. दिलदारी अन् निष्ठेचा अपूर्व मिलाफ असलेले गंगाधरराव आजही अनेकांना आठवतात. तेव्हापासून माणसांचा राबता फडणवीसांचे घर अनुभवत आले आहे. सरिताकाकूंना नागपूरच्या राजकारणाची चांगली ओळख आहे आणि तेथील घडामोडींची माहितीही त्या घेत असतात. नागपुरात महापालिकेची निवडणूक असताना खरे तर तेथेच राहणे त्यांनी पसंत केले असते, पण निवडणुकीपर्यंत त्या वर्षावरच थांबणार आहेत, ते केवळ ‘देवेन’च्या काळजीपोटी. मुलावर निराधार आरोप वा अनावश्यक टीका झाली की, त्या व्यथित होतात. ‘एवढ्या घबडग्यात त्याला एकदा नुसतं पाह्यलं तरी बरं वाटतं अन् एक आई म्हणून त्याची मानसिकता त्याच्या देहबोलीतूनच कळते, असे काकू सांगत होत्या. २१ तारखेला मात्र, त्या ‘देवेन’बरोबर मतदानाला नागपूरला जाणार आहेत.
राज यांची घालमेल
मनसेचे प्रमुख राज ठाकरे अजूनही प्रचारात पूर्णपणे उतरलेले नाहीत. खास ठाकरे शैलीतील त्यांच्या भाषणाची तोफ अद्याप धडाडलेली नाही. मुलगा अमितच्या आजारपणामुळे राज यांना त्याच्याजवळ राहणे निकडीचे आहे. त्यामुळे नेता व पिता यात घालमेल होतेय. अर्थात, व्हॅलेंटाइन डे पासून त्यांच्या सभांचा धडाका सुरू होतोय. पिता म्हणून त्यांना असलेली काळजी नक्कीच दूर होईल आणि नेता म्हणूनही त्यांना चांगले यश मिळेल, अशी सदिच्छा बाळगायला काय हरकत आहे?
तर मग ‘जाहीरनामा’ की ‘वचननामा’?
शिवसेना आणि भाजपाची जोरदार टक्कर मुंबई महापालिकेत होतेय. शिवसेनेने परंपरेप्रमाणे वचननामा दिला अन् मग त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाँड पेपरवर भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दोघांनाही स्वबळावर सत्तेत येण्याचा विश्वास आहे आणि त्यामुळे एकमेकांची गरज भासणार नाही, असे ते ठणकावून सांगताहेत. असेच ते विधानसभेच्या वेळीही बोलत होते, पण गरज पडलीच ना! मग दोघेही एकत्र येऊन सत्तेत सहभागी झाले. आताही तशी परिस्थिती आली, तर वचननाम्याची अंमलबजावणी होणार की जाहीरनाम्याची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्हींचा संकर करून ‘जाहीवचनामा’ किंवा ‘वचजाहीरनामा’ असे संकर करण्याचा एक विषय समोर येईल आणि या संकरासाठी विनोद तावडे, अनिल देसाई, आशिष शेलार, अनिल परब यांची एक समन्वय समिती स्थापन होईल. तब तक चलने दो भाई!
त्याचे नाव शिवसेना
शिवसेनेच्या प्रचारफेऱ्या पाहण्यासारख्या असतात. इतर काही पक्षांसारखे भाडोत्री लोक त्यात आणलेले नसतात. भगवा दुपट्टा गळ्यात टाकून शिवसैनिक अन् महिला आघाडीच्या कार्यकर्त्या दिलेल्या वेळेत, दिलेल्या ठिकाणी प्रचारफेरीसाठी सज्ज असतात. सरकारी वा खासगी नोकरीत असलेले शिवसैनिक आठ-पंधरा दिवसांची रजा टाकून प्रचारात उतरतात. सकाळी उमेदवाराकडून वडापाव, दुपारी पोळीभाजी वा खिचडी आणि संध्याकाळीही खिचडी वगैरे खायला मिळते, बस तेवढेच. यापेक्षा जास्त अपेक्षाही कोणालाच नसते. प्रचारातील भारावलेपण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते. परवा दुपारी लालबागमध्ये प्रचार संपवून कार्यकर्ते बसलेले होते. डाळखिचडीचे छोटे डबे वाटले गेले. सगळे खात असताना एक जुना शिवसैनिक दुसऱ्याला तो डबा देत म्हणाला, ‘अरे! मला शुगर आहे ना! भात चालत नाही, तू खा. इकडे माझी बहीण राहते ती दोन पोळ्या अन् मेथीची भाजी आणते म्हणाली, तिची वाट पाहतोय.’ सेनेच्या कार्यकर्त्यांचे असे नेटवर्क अन् असे कमिटमेंट.. जय महाराष्ट्र!!!