प्रचारफेरी
By admin | Published: February 20, 2017 01:39 AM2017-02-20T01:39:30+5:302017-02-20T01:39:30+5:30
भाजपाचे खासदार किरीट सोमय्या हे भाजपाचे ‘स्कॅमस्टार’ आहेत. एकामागून एक घोटाळे काढताना त्यांनी भाजपाच्या काही नेत्यांनादेखील
सोमय्यांना मुख्यमंत्र्यांचा चाप
भाजपाचे खासदार किरीट सोमय्या हे भाजपाचे ‘स्कॅमस्टार’ आहेत. एकामागून एक घोटाळे काढताना त्यांनी भाजपाच्या काही नेत्यांनादेखील अडचणीत आणले होते. त्यांच्या विश्वासार्हतेवर अनेकदा विरोधक प्रश्नचिन्हदेखील लावतात; पण सोमय्या प्रकरणे बाहेर काढत राहतात. प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात काही आरोप केले. उद्धव यांना संपत्ती जाहीर करण्याचे आणि आरोपांची उत्तरे देण्याचे आव्हान ते दोन-तीन दिवस सतत करीत होते. नंतर त्या आव्हानावर पडदा पडला. माहिती अशी आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. ठाकरे वा शिवसेनेच्या कोण्या नेत्यांबाबतचे पुरावे तुमच्याकडे असतील तर ते योग्य त्या यंत्रणेकडे द्या, निवडणुकीच्या काळात वैयक्तिक आरोप टाळून निकोप राजकारण केले पाहिजे, असा समजवजा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
घाणेरडे राजकारण
मतदानाला काही तास उरलेले असताना आता सोशल मीडियातून घाणेरडे राजकारण सुरू झाले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे हात जोडून नमस्कार करीत असून, शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन करीत असल्याची एक दिशाभूल करणारी पोस्ट व्हायरल झाली आहे. भाजपाच्या जाहिरातीत गजरऐवजी गाजर शब्द वापरून अशीच एक फेक पोस्ट फिरविली गेली. शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्या लेटरहेडवर एक फेक सर्वेक्षण टाकून पोस्ट फिरवणे सुरू आहे. त्यात भाजपाला १०५ तर शिवसेनेला ८० जागा मिळतील, असे म्हटले आहे. खाली संजय राऊत यांची नकली सही करण्यात आली आहे. निवडणूक निकालाचे एका चॅनेलने केलेले फेक सर्वेक्षण गेल्या आठवड्यात फिरले. आता मतदानाला काहीच तास उरले असताना अशी फेकाफेकी आणखी होऊ शकते. मतदारराजा जागते रहो!
जिधर बम उधर हम
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रविवारी मुंबईतील सगळ्याच प्रभागांमध्ये जंगी प्रचारफेऱ्या निघाल्या. एकाच प्रभागातील सर्व उमदेवारांच्या प्रचारफेऱ्यांमध्ये जबरदस्त गर्दी असल्याचं चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळालं. त्यामुळे हवा नेमकी कोणाची याचा अंदाज त्यावरून तरी येत नव्हता. वरळी भागात एक कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या प्रचारफेरीत बेंबीच्या देठापासून घोषणा देत होता. दुपारी १च्या सुमारास तो एका गाडीच्या आडोशाला जाऊन उभा राहिला. राष्ट्रवादीचा दुपट्टा खिश्यात टाकला अन् दुसऱ्या खिश्यातून भाजपाचा दुपट्टा गळ्यात टाकला. एकदम निष्ठा कशी काय बदलली असं विचारलं तर त्यानं अगदीच व्यावहारिक उत्तर दिलं. सकाळपासून साडेबारापर्यंत मी घड्याळाची रोजी घेतली आता सायंकाळपर्यंत भाजपाची घेतलीय, असं सांगत तो लगबगीनं चालू लागला.
ते दिवस वेगळे होते...
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ‘शिवसेनेची २५ वर्षे युतीमध्ये सडली,’ अशी खंत प्रत्येक प्रचारसभेमध्ये व्यक्त करीत आहेत. सहज आठवलं... २०१४च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती होती. तेव्हा त्यांनी मुखपत्रात एक मॅरेथॉन मुलाखत दिली. तेव्हा, युतीमुळे दोन्ही पक्षांचा कसा फायदा झाला हे त्यांनी सांगितले होते. दिवस बदलले. विधानसभा निवडणुकीत युती तुटली. दोघांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले. आता तर ‘करो या मरो’ची लढाई चालली आहे. राजकारणामध्ये असे मागचे मागचे शोधून; खोदून काढायचे नसते. मुख्यमंत्र्यांनी बघा ‘माजी गुंड’ हा शब्द कसा शोधून काढलाच ना? भाजपासारख्या संस्कारी पक्षाची त्यामुळे सोय झाली.