प्रचाराला चढला वेग
By admin | Published: November 5, 2016 03:48 AM2016-11-05T03:48:52+5:302016-11-05T03:48:52+5:30
डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या रिंगणातील उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला आहे.
जान्हवी मोर्ये,
डोंबिवली- डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या रिंगणातील उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. अक्षयकुमार काळे, प्रवीण दवणे यांनी मतदारांशी संपर्क पूर्ण झाला असून प्रत्यक्ष गाठीभेटीही घेतल्याचे नमूद केले आहे. जयप्रकाश घुमटकर यांनी आयोजक संस्थेची मते मिळण्याचा दावा केला असून दौरे सुरू असल्याचे सांगितले. मदन कुलकर्णी यांचा मतदारांशी फोनवरून संपर्क झाला आहे. ते ५ नोव्हेंबरपासून प्रचाराठी फिरणार आहेत. चारही उमेदवारांना निवडून येण्याची खात्री आहे.
मतदारांचा प्रतिसाद उत्साहवर्धक असला, तरी प्रत्यक्षात किती मते मिळतील त्याचा अद्याप नेमका अंदाज बांधता येत नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. साहित्यिक मतदार हा सूज्ञ असल्याने तो चांगल्याचीच निवड करेल, अशीही उमेदवारांची भूमिका आहे.
>प्रत्यक्ष संवादावर भर : प्रविण दवणे
मी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे. प्रत्येक मतदाराने मला सांगितले, माझी पुस्तके त्यांनी वाचलेली आहेत. माझ्या पुस्तकांचे संच त्यांच्याकडे आहे, असा अनुभव प्रवीण दवणे यांनी सांगितला. माझे विद्यार्थी गावोगावी पसरलेले आहेत. त्यांनी मला हमी दिली आह,े ते आनंदाने माझा प्रचार करतील. मतदार हा सुजाण व अभिरुचीसंपन्न असल्याने उमेदवाराचे मूल्यमापन करुन ते मतदान करतील. प्रत्येक मतदाराशी मी शंभर टक्के संवाद साधला आहे. माझी गीते व पुस्तके आधीच त्यांच्यापर्यंत पोहचलेली असल्याने मला अधिक बोलण्याची गरज नाही. सध्याचा काळ प्रयत्नाने पुढे जाण्याचा असल्याने कोण विजयी होईल, याचा निश्चित अंदाज बांधता येत नाही. जय-पराजयाचा आनंदाने स्वीकार करु. मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे, असेही त्यांनी सांगितले.
>सर्व ठिकाणचा प्रचार पूर्ण : काळे
सर्व ठिकाणी माझा प्रचार पूर्ण झाला आहे. परवाच त्यांचे हैदराबाद येथे व्याख्यान झाले, असे अक्षयकुमार काळे यांनी सांगितले. मतदारांची अपेक्षा आणि अध्यक्षपदाची भूमिका ही वेगळी असू शकत नाही. आत्तापर्यंत मला १०४ साहित्यिकांचा पाठिंबा मिळाला आहे. मला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. त्यामुळे मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १०० टक्के निवडून येईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
>माझे पारडे जड : घुमटकर
अन्य उमेदवारांपेक्षा माझे पारडे जड असल्याचा आणि आयोजक संस्थेची सर्व मते मलाच मिळतील, असा दावा जयप्रकाश घुमटकर यांनी केला. नाशिक, धुळ््याचा दौरा केला आहे. रावसाहेब पवार, रावसाहेब कसबे यांचा मला पाठिंबा आहे. ३५० पेक्षा जास्त मतदारांशी माझा संवाद झाला आहे. त्यांच्या थेट गाठीभेटी घेतल्या आहेत. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असा दावा त्यांनी केला.
>प्रत्यक्ष गाठीभेटींना सुरूवात : कुलकर्णी
माझ्या कामाची माहिती मी प्रत्येक मतदाराला पाठविली आहे. प्रत्येकाशी फोनद्वारे संवाद साधला.भेटीगाठींसाठी शनिवारपासून बाहेर पडणार आहे. १५ नोव्हेंबरला डोंबिवलीत येणार आहे. भेटीगाठींआधी ३५० पेक्षा जास्त जणांना मोबाइलवरुन मेसेज पाठविले आहेत, असे मदन कुलकर्णी यांनी सांगितले. ही निवडणूक संक्रमण मतपद्धतीने होत असल्याने नेमके कोण जिंकून येईल याचा अंदाज बांधता येत नाही. मी एक तटस्थ साहित्यिक असल्याने निवडणुकीआधीच विजयाचा दावा करणे मला योग्य वाटत नाही. भेटीगाठीनंतर चित्र पालटू शकते. नागपूरचे साहित्य कला विकास मंडळ, साहित्य विहार, पद्मगंधा साहित्य संस्था, अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था, रसिकराज सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थांनी मला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.