सहाय्यक आयुक्तांची पदोन्नती आणखी लांबणीवर

By admin | Published: July 13, 2017 08:49 PM2017-07-13T20:49:46+5:302017-07-13T20:49:46+5:30

गेल्या दहा महिन्यापासून सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी), उपअधीक्षक (डीवायएसपी) पदाच्या पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या

Promotions of Assistant Commissioner are further deferred | सहाय्यक आयुक्तांची पदोन्नती आणखी लांबणीवर

सहाय्यक आयुक्तांची पदोन्नती आणखी लांबणीवर

Next

जमीर काझी /ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - गेल्या दहा महिन्यापासून सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी), उपअधीक्षक (डीवायएसपी) पदाच्या पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या २९० वर पोलीस अधिकाऱ्यांना आणखी काहीकाळ प्रतिक्षेत रहावे लागणार आहे.त्यासाठी पात्र असणाऱ्याची यादी नव्या महसूली संवर्गानुसार पाठविण्याची सूचना गृह विभागाने केली असल्याने त्यासाठी विलंब लागणार आहे. दहा महिन्यात संबंधितांकडून ३,४ वेळा प्रस्ताव मागवूनही त्यावर काहीच कार्यवाही न करता पुन्हा हा उठाठोप करावा लागल्याने संबंधित अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

कोकण-१ व कोकण २ या नव्या महसूली विभागासह यादी पाठवावयाची असल्याने आता आणखी दीड,दोन महिने प्रमोशनची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. २८,३० वर्षे कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यांपैकी बहुतांशजण निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. तर अनेकजण बढतीच्या प्रतिक्षेत रिटायर झाले, मात्र पोलीस मुख्यालय व गृह विभागातील समन्वयाअभावी नऊ महिन्यापासून या अधिकाऱ्यांच्या बढतीचा ‘मुहूर्त ’ लांबणीवर पडला आहे.

उपनिरीक्षक म्हणून भरती झालेला खुल्या गटातील अधिकारी सुमारे ३० वर्षाच्या सेवेनंतर ‘एसीपी’च्या पदोन्नतीच्या यादीत येतो. तर मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकाऱ्यांना तुलनेत काही वर्षे आधी ही संधी मिळते. एसीपी, डीवायएसपीची बढती वर्षातून सरासरी दोनवेळा होणे अपेक्षित आहे. मात्र गृह विभागातील अधिकारी व प्रशासकीय दिरंगाईमुळे हा नियम केवळ कागदावरच राहिला आहे.अनेकांना ही बढती न घेता निरीक्षक पदावर रिटायर होण्याची वेळ आली आहे.

गृह विभागाने गेल्यावर्षी १आॅक्टोंबरला राज्यातील १०४ निरीक्षकांना प्रमोशन दिले होते. त्यावेळी अनेक रिक्त पदे असूनही पुर्ण जागा भरण्यात आलेल्या नव्हत्या. त्यानंतर या वर्षाच्या मार्च महिन्यात बढतीची यादी काढण्यात येईल,असे सांगितले जात होते. त्यासाठी १ जानेवारी २०१६ च्या निरीक्षकांच्या पात्रता सूचीतील अधिकाऱ्यांची प्रत्येक पोलीस घटकांतून मुख्यालयाकडे प्रस्ताव मागविण्यात आले,त्यानंतर पुन्हा मे, जून महिन्यात पुुन्हा माहिती मागवून घेतली. त्याबाबत गेल्या महिन्यात गृह विभागाकडे पाठविण्यात आली. मात्र ती ग्राह्य न धरता कोकण विभागाची दोन संवर्गात विभागणी करुन त्यानुसार रिक्त जागेच्या प्रमाणानुसार नव्याने प्रस्ताव पाठविण्याची सूचना महासंचालक कार्यालयाला करण्यात आलेली आहे. त्यामुळे अस्थापना विभागाकडून आता रिक्त असलेल्या २९० पदासाठी संबंधित सेवा जेष्टतेनुसार त्यांची पसंतीच्या ठिकाणाची यादी मागविण्यात आली आहे.

पोलीस घटकांकडून ही यादी आल्यानंतर त्यामध्ये सवर्गनिहाय रिक्त जागेच्या प्रमाणात बदल करुन ती गृह विभागाकडे पाठविली जाणार आहे. त्यासाठी किमान दीड,दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

एसीपीच्या पदोन्नतीसाठी कोकण-१ व कोकण २ या नव्या महसूली संवर्गातील रिक्त प्रस्तावानूसार यादी पाठविण्याची सूचना गृह विभागाने केल्याने त्याला विलंब झाला आहे. त्यामुळे पोलीस घटकांकडून ती उपलब्ध झाल्यानंतर सुधारित प्रस्ताव पाठविला जाईल, पदोन्नती लवकर होण्यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत.
-सतीश माथूर ( पोलीस महासंचालक)

महसूली संवर्गजिल्हे-

कोकण-१ पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,रायगड,
कोकण:२ मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे,
नागपूर गडचिरोली, गोंदिया,भंडारा,चंद्रपूर, वर्धा, नागपूर
अमरावती वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला
औरंगाबाद हिंगोली, उस्मानाबाद,नांदेड, जालना, लातूर,बीड, परभणी,
औरंगाबाद
नाशिक नंदूरबार, धुळे, अहमदनगर, जळगाव,नाशिक,
पुणे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे

Web Title: Promotions of Assistant Commissioner are further deferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.