‘हल्लाबोल’वाल्यांच्या ‘डल्लामार’चे पुरावे देणार, मुख्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 08:31 PM2017-12-10T20:31:03+5:302017-12-10T20:31:34+5:30
एकीकडे विरोधी पक्षांनी ‘हल्लाबोल’ यात्रेच्या माध्यमातून सरकारविरोधात पवित्रा घेतला असताना सत्ताधारीदेखील त्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाले आहे.
नागपूर : एकीकडे विरोधी पक्षांनी ‘हल्लाबोल’ यात्रेच्या माध्यमातून सरकारविरोधात पवित्रा घेतला असताना सत्ताधारीदेखील त्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाले आहे. ‘हल्लाबोल’वाल्यांच्या ‘डल्लामार’ यात्रेचे पुरावे सभागृहासमोर मांडण्यात येतील. शेतकºयांच्या स्थितीला कॉंग्रेस-राष्ट्रवादीच कसे जबाबदार आहे हे पुराव्यांसह सादर करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सोमवारपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेतच यातून मिळाले आहेत.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आघाडीच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातील कामे आणि आम्ही ३ वर्षांत केलेली कामे यांचा लेखाजोखाच सभागृहात मांडू. विरोधकांकडून कर्जमाफी तसेच शिष्यवृत्तीसंदर्भात आरोप होत आहेत. मात्र घोटाळे करण्याची सवय असलेल्यांना प्रामाणिकपणे काम होत आहे, यावर विश्वासच बसत नाही. सिंचन घोटाळ्याची चौकशी योग्य दिशेने होत आहे. या संदर्भात आणखी अनेक जणांवरदेखील कारवाई करण्यात येईल, असेदेखील मुख्यमंत्री म्हणाले. राज्याच्या ‘जीडीपी’ची वाढ इतर राज्यांच्या तुलनेत चांगली असून पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारने कर्ज घेतले आहे. सरकार विकासकामांना कात्री लावणार नाही. त्यामुळे राज्याच्या आर्थिक दिवाळखोरीची काळजी विरोधकांनी करू नये, असा टोलादेखील मुख्यमंत्र्यांनी लगावला.
कर्जमाफी झालेल्या शेतक-यांची तालुकानिहाय नावे जाहीर करण्यात येतील, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. राज्यात कर्जमाफी पारदर्शक पद्धतीनेच झाली. शेवटच्या पात्र शेतकºयाची कर्जमाफी होईपर्यंत ही प्रक्रिया चालविण्यात येईल. तसेच पात्र असूनदेखील अर्ज न करू शकलेल्या शेतकºयांनादेखील या योजनेत समाविष्ट करण्यात येईल. कर्जमाफीसाठी एकूण ७७ लाख खात्यांचे अर्ज आले. त्यापैकी ६९ लाख खाती प्रोसेसिंगसाठी घेतली. त्यातून जवळपास ४१ लाख खात्यांचे निर्णय झाले असून त्यांच्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत धान, ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची आवक वाढली आहे. हिवाळी अधिवेशनात १३ विधेयके प्रस्तावित असल्याची माहितीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
विरोधकांची ‘टेप’ सैराटवरच अडकली
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य शासनावर टीका करत ‘सैराट’ कारभार सुरू असल्याची टीका केली. तीन वर्षांनंतरदेखील विरोधकांची ‘टेप’ सैराटवरच अडकली आहे. त्यानंतर निघालेल्या चित्रपटांची नावे त्यांना कुणीतरी द्यावी, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला. विरोधी पक्षात असताना कसे बोलले पाहिजे, हे तेथील नेत्यांनी शिकले पाहिजे, असेदेखील मुख्यमंत्री म्हणाले.
बोंडअळीग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी केंद्राला प्रस्ताव
बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकºयांचे नुकसान झाले आहे. ‘बीटी’चे ‘लायसन्स’ देण्यात येत असताना पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होणार नाही, असा दावा कंपन्यांनी केला होता. त्या कंपन्यांकडून शेतकºयांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात येईल. विमा काढलेल्यांनादेखील नुकसानभरपाई मिळेल. सोबतच ‘एनडीआरएफ’च्या माध्यमातून केंद्राकडूनदेखील मदत घेण्यात येईल. याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तुडतुड्यामुळे धानउत्पादन शेतकºयांच्या झालेल्या नुकसानासंदर्भात सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यांनादेखील मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नाना पटोलेंना चूक लक्षात येईल
यावेळी मुख्यमंत्र्यांना नाना पटोले यांच्या राजीनाम्यासंदर्भात विचारणा करण्यात आली. नाना पटोले यांना अगोदरदेखील पक्ष सोडल्याची उपरती झाली. आतादेखील आपण चूक केली असल्याचे त्यांना लवकरच लक्षात येईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. आ.आशिष देशमुख यांनी वेगळ््या विदर्भावरून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली होती. मात्र हे पत्र अगोदर प्रसारमाध्यमांकडे गेले. मी अद्याप ते वाचलेले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.