छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे द्या; संजय राऊत यांचे उदयनराजेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 02:24 AM2020-01-16T02:24:14+5:302020-01-16T02:24:43+5:30

लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात परखड मुलाखत

Proof that you are a descendant of Chhatrapati; Sanjay Raut challenges Udayan Raje | छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे द्या; संजय राऊत यांचे उदयनराजेंना आव्हान

छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे द्या; संजय राऊत यांचे उदयनराजेंना आव्हान

googlenewsNext

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदरच करतो. महाराजांचे नाव जिथे येते, तिथे आम्ही नतमस्तकच होतो. पण शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. शरद पवार यांना जाणता राजा ही उपाधी जनतेने दिली आहे. रक्षणकर्ता राजा असतो, लुटणारा राजा नसतो, असाही चिमटा त्यांनी काढला.

लोकमत’च्या वतीने पुण्यात बुधवारी आयोजित लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात राऊत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा या वेळी उपस्थित होते. लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली. टिळक स्मारक मंदिर येथे रंंगलेल्या सोहळ्यास पुणेकरांनी गर्दी केली होती.

उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका करताना ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असे नाव करावे, असे म्हटले होते. यावर राऊत म्हणाले, उदयनराजे काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भाजपचे माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. शिवाजी महाराज हे युगपुरुष होते आणि आम्ही त्यांना दैवत मानतो. गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावे लागत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

फडणवीस सरकारच्या ८० तासांच्या सरकारमधील अजित पवार यांच्या भूमिकेबाबत राऊत म्हणाले, तो फुसका बार होता. अजित पवार व आम्ही आदल्या दिवशी मांडीला मांडी लावून बसलो होतो. भाजपाने आमच्या आघाडीचे नट बोल्ट ढिले करण्याचा प्रयत्न केला. परंतु, गाडी बंद पडणार नाही हा विश्वास होता. ते आमची स्टेपनी घेऊन गेले. स्टेपनीही महत्त्वाची असते. आता या स्टेपनीचे चाक गाडीला लागले आहे. त्यामुळे सरकारची गाडी व्यवस्थित चालू आहे. याच अनुषंगाने धनंजय मुंडे यांना कसे गंडवले सांगताना ते म्हणाले, बोलणे झाले नसतानाच १० मिनिटात मुंडे हे यशवंतराव चव्हाण केंद्रात येणार असल्याचे सांगितले. ते त्यांनी टीव्हीवर पाहिले. शरद पवारांशीही बोलणे झाले असल्याने त्यांना परत येणे सोपे झाले.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच महाविकास आघाडीचे सरकार बनविण्याचे प्लॅनिंग सुरू होते, असा गौप्यस्फोट करून ते म्हणाले, भाजप शब्द पाळणार नाही याची मला खात्री होती. त्यामुळे अगोदरपासून नियोजन केले. त्या ३६ दिवसांतील अनेक घटना राऊत यांनी सविस्तर सांगितल्या. महाविकास आघाडी सरकारला खिचडी सरकार म्हणत नाहीत, कारण त्याचे नेतृत्व उध्दव ठाकरे करत आहेत. सरकारबद्दल सकारात्मक भावना आहेत. शंभर दिवस, मग पाचशे दिवस असे कोणते सोहळे करायचे ते आम्ही ठरवले आहे. सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल. त्यानंतरचे प्लॅनिंगही आम्ही केले आहे, असे ते म्हणाले.

शिवसेनेने कॉँग्रेस- राष्टÑवादी कॉँग्रेसशी केलेल्या आघाडीबाबत ते म्हणाले, हे दोन्ही पक्ष पाकिस्तानातील नाहीत. तसे असतील तर पंतप्रधान मोदींनी ते सांगावे. हिंदुत्वावर ते म्हणाले, की, कॉँग्रेसही हिंदुत्व मानतो. महात्मा गांधी सर्वात मोठे हिंदुत्ववादी होते. राहुल गांधीही मंदिरांमध्ये जातात, जानवे दाखवितात. इंदिरा गांधीही जायच्या. पण धर्मावर राज्य, देश चालू शकत नाही. अन्यथा आपला पाकिस्तान होईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही राजकारणात धर्म आणण्यास विरोध होता. धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेतील महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येकाने आपले विचार पाळावेत. आम्ही आमचा विचार, भूमिका सोडलेली नाही. हिंदुत्व ही आमची श्रध्दा आहे. मात्र, राज्यकारभार घटनेनुसारच व्हायला हवा.

आम्ही कुठल्या घराण्यात जन्मलो हे महाराष्ट्र जाणतो - शिवेंद्रसिंहराजे भोसले
‘आम्ही कुठल्या घराण्यात जन्माला आलो, ते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. संजय राऊतांना याचा काय पुरावा पाहिजे,’ असा सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘राऊतांना काय पुरावा पाहिजे, हे त्यांनी सांगावे. वाद त्यांनीच सुरू केला आहे. मी काय किंवा उदयनराजे, संभाजीराजेही यावर कधी बोलले नव्हते. छत्रपतींच्या घराण्यात जन्मल्याचा पुरावा आम्ही काय द्यायचा. कोण कुठल्या घरात जन्मलंय हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आता हा वाद संपवायचा कसा हे राऊतांनी सांगावं.
 

Web Title: Proof that you are a descendant of Chhatrapati; Sanjay Raut challenges Udayan Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.