प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 07:32 AM2024-05-19T07:32:44+5:302024-05-19T07:33:38+5:30
मतदानाचा शेवटचा टप्पा असल्याने व त्यातही बहुतांश मतदारसंघ मुंबईतील असल्याने राज्यासह देशातील प्रमुख नेत्यांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा उडविला होता.
नवी दिल्ली : महाराष्ट्रात धडाडत असलेल्या प्रचारतोफा दीड महिन्यानंतर शांत झाल्या. राज्यातील एकूण पाचव्या टप्प्यांपैकी शेवटच्या टप्प्यात १३ मतदारसंघांसह देशातील ८ राज्यांतील ४९ जागांसाठी सोमवारी (दि. २०) मतदान होणार आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा असल्याने व त्यातही बहुतांश मतदारसंघ मुंबईतील असल्याने राज्यासह देशातील प्रमुख नेत्यांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा उडविला होता.
पाचव्या टप्प्यात कोणकोणती राज्ये?
बिहार (५), झारखंड (३), महाराष्ट्र (१३), ओडिशा (५), उत्तर प्रदेश (१४), पश्चिम बंगाल (७), जम्मू-काश्मीर (१) लडाख (१)
ओडिशात दुसऱ्या टप्प्याचे मतदान
सोमवारी ओडिशा विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात ३५ जागांसाठी मतदान होणार आहे. तेथीलही प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी शांत झाल्या.