कोट्यवधीची मालमत्ता धूळखात पडून

By admin | Published: September 20, 2016 03:08 AM2016-09-20T03:08:36+5:302016-09-20T03:08:36+5:30

महापालिकेने शहरात कोट्यवधी रूपये खर्च करून बस डेपो, सामाजिक सुविधेच्या इमारती बांधल्या आहेत.

The property of billions of property is in the dust | कोट्यवधीची मालमत्ता धूळखात पडून

कोट्यवधीची मालमत्ता धूळखात पडून

Next

नामदेव मोरे,

नवी मुंबई- महापालिकेने शहरात कोट्यवधी रूपये खर्च करून बस डेपो, सामाजिक सुविधेच्या इमारती बांधल्या आहेत. परंतु वापर होत नसल्याने त्या इमारतींची प्रचंड दुरवस्था झाली आहे. जनतेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी झाली असून या वास्तूंचा योग्य उपयोग करण्यात पालिकेला अपयश आले आहे. सिडको व पोलीस यंत्रणांच्याही अनेक वास्तू वापराविना पडून असल्याने नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
शिळ - महापे रोडवर वाहतूक चौकीजवळ एमआयडीसीने प्रशस्त बसडेपो उभारला आहे. बांधकाम झाल्यानंतर ती वास्तू महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताब्यात दिली आहे. अनेक वर्षांपासून त्या वास्तूचा व डेपोचा उपयोगच केलेला नाही. सद्यस्थितीमध्ये डेपोची कचराकुंडी झाली आहे. इमारत धोकादायक होवू लागली आहे. बसडेपोवर खर्च केलेले करोडो रूपये व्यर्थ गेले आहेत. महापे बस डेपोप्रमाणे अनेक इमारतींची अवस्था अशीच बिकट झाली आहे. सानपाडामध्येही महापालिकेने ५२ लाख रूपये खर्च करून समाजमंदिर बांधले आहे. परंतु जवळपास सात वर्षांमध्ये ते सुरूच झालेले नाही. बिल न भरल्यामुळे विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला असून अशीच स्थिती राहिली तर वापर न होताच तीही वास्तू मोडकळीस येवू शकते. सीबीडीमधील गौरव म्हात्रे कला केंद्राजवळ पालिकेने खुले सभागृह बांधले आहे. या सभागृहाच्या उद्घाटनावरून तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक व आमदार मंदा म्हात्रे यांचा वादही झाला होता. या वादग्रस्त सभागृहाचाही पुन्हा वापर झाला नसून तेथे तळीरामांचा अड्डा होवू लागला आहे. याच परिसरातील सुनील गावस्कर मैदानामधील सभागृहाचीही दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या बहुतांश सभागृह, व्यायामशाळा व इतर वास्तूंचा योग्य वापर होत नसून त्यावर केलेला खर्च व्यर्थ गेला आहे.
महापालिकेसोबत सिडको व इतर शासकीय आस्थापनाही मालमत्तांच्या संरक्षणाकडे योग्य लक्ष देत नाहीत. सिडकोने खारघरमध्ये भव्य ग्रामविकास भवन बांधले आहे. बांधकाम पूर्ण होवूनही ते सुरू केलेले नाही. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात त्याचीही प्रचंड दुरवस्था होण्याची शक्यता आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे उद्यान म्हणून उल्लेख करत असलेल्या सिडकोच्या सेंट्रल पार्कमधील उपाहारगृहांच्या इमारतींचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. या बांधकामांवर केलेला खर्च फुकट गेला आहे. पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरामध्ये महापालिका व इतर खाजगी संस्थांच्या मदतीमधून अनेक पोलीस चौक्या सुरू केल्या आहेत. परंतु अनेक ठिकाणी चौक्यांना टाळे लावण्यात आले आहेत. प्रशासन व लोकप्रतिनिधीही या वास्तूंचा योग्य वापर करण्याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
>महापालिका आयुक्तांनी सुरू केले सर्वेक्षण
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून मालमत्ता विभागाकडेही विशेष लक्ष देण्यास सुरवात केली आहे. सर्व मालमत्तांचा आढावा घेतला जात आहे. भाडे थकविणाऱ्या सामाजिक संस्थांवर कारवाई केली जात आहे. मार्केट व इतर इमारतींचा वापर करण्यासाठीची उपाययोजना सुरू असली तरी प्रत्यक्षात बंद इमारतींचा वापर सुरू करण्यात अद्याप यश आलेले नाही.
>जबाबदारी कोणाची?
सिडको, महापालिका व पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असणाऱ्या अनेक वास्तूंचा काहीही वापर होत नाही. या इमातींच्या बांधकामांवर करोडो रूपये खर्च करण्यात आले आहेत. अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. जनतेच्या पैशांची प्रचंड उधळपट्टी झाली असून त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.
> वापराविना पडून असलेल्या वास्तू
सीबीडीमध्ये गौरव म्हात्रे कला केंद्राजवळील सभागृह
शहरातील साफसफाई कामगारांसाठी बांधलेली हजेरी शेड
राजीव गांधी मैदानाजवळील मार्केट
सीबीडी सेक्टर १ मधील सुनील गावस्कर मैदानातील सभागृह
नेरूळ सेक्टर १६ मधील भाजी मार्केट व शाळा
सीवूडमधील मासळी मार्केट अनेक वर्षांपासून बंद
सारसोळेमधील मार्केटचाही वापर नाही
सानपाडा समाजमंदिर सात वर्षांपासून धूळखात पडून
महापे एनएमएमटीच्या डेपोचे खंडरात रूपांतर
वाशी सेक्टर २ मधील सार्वजनिक वाचनालय
वारलीपाडा येथील आदिवासींसाठी बांधलेली घरे

Web Title: The property of billions of property is in the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.