अकोल्यात प्रॉपर्टी ब्रोकरची गोळ्य़ा झाडून हत्या
By admin | Published: November 4, 2015 02:25 AM2015-11-04T02:25:58+5:302015-11-04T03:08:29+5:30
आर्थिक देवाण-घेवाणीतून घटना घडल्याचा संशय
अकोला - शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक तथा प्रॉपर्टी ब्रोकर किशोर खत्री यांची अज्ञात मारेकर्यांनी सोमठाणा शिवारात धारदार शस्त्र आणि गोळ्य़ा झाडून निर्घृण हत्या केल्याने खळबळ माजली आहे. आर्थिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा संशय असून पोलिसांनी काही संशयीतांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. प्रॉपटी ब्रोकर किशोर खत्री यांची चित्रा टॉकीजच्या जागेवरील कॉम्प्लेक्समध्ये भागीदारी आहे. यामधील बहुतांश गाळे खत्री यांच्या मालकीचे आहेत. मंगळवारी दुपारी ३ ते ४ वाजतादरम्यान खत्री एका कारमधून सोमठाणा परिसरात गेले होते. या कॉम्प्लेक्सच्या भागीदारीच्या जमा-खर्चावरून अज्ञात मारेकरी व किशोर खत्री यांच्यात वाद झाला. या ठिकाणी खत्री यांना बेदम मारहाण करण्यात आली. खत्री यांनी जीव वाचविण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविल्याने ते रस्त्याच्या कडेला पडले. खत्री जमिनीवर कोसळताच त्यांचा गळाच चिरला. डोक्यावर व छातीवरही शस्त्रांनी हल्ला करुन गोळ्या झाडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खत्री यांचा मृतदेह सोमठाणा येथील ग्रामस्थांना दिसताच त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख जितेंद्र सोनवने, जुने शहरचे ठाणेदार रियाज शेख यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी काही संशयितांना रात्री उशिरा ताब्यात घेतले. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलीप खत्री यांच्या तक्रारीवरून अज्ञात मारेकर्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.