आता मिळणार प्रॉपर्टी कार्ड
By admin | Published: April 27, 2016 01:42 AM2016-04-27T01:42:13+5:302016-04-27T01:42:13+5:30
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने दहा गावांमध्ये नवनगर विकसित करण्यात आले.
निगडी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने दहा गावांमध्ये नवनगर विकसित करण्यात आले. मात्र, कागदपत्रांचे अद्ययावतीकरण करण्यात प्राधिकरण पिछाडीवर राहिले. महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाते. प्राधिकरणातील रहिवाशांना याबाबतची सोय नव्हती. प्राधिकरणवासीयांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सेक्टर तीनपासून त्याची सुरुवात होणार असून, अन्य पेठांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ शहरातील दोन लाख रहिवाशांना होणार आहे.
औद्योगिकीकरणाचा विकास झाल्यानंतर कामगार कष्टकरी वर्गाच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाली. या संस्थेस ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. प्राधिकरणाने ४ हजार ३२३ हेक्टर क्षेत्र प्राधिकरणाने ताब्यात घ्यायचे ठरवले. त्यापैकी संपादनाखाली २५८४ हेक्टर क्षेत्र असून प्रत्यक्ष ताब्यात आलेले क्षेत्र १७७१ हेक्टर आहे, त्यापैकी १३२५ हेक्टर क्षेत्र विकसित केले आहे. सुरुवातीला एकूण ४२ पेठांचे नियोजन केले. त्यापैकी अनेक पेठा विकसित झालेल्या नाहीत. अनेक पेठांवर अतिक्रमणे झाली आहेत. प्राधिकरणाकडे उपलब्ध असणारी यंत्रणा आणि वेळोवेळी कार्यालयाचे झालेले स्थलांतर यामुळे प्राधिकरणाच्या बहुतांश क्षेत्रांचे नकाशे, सीमांकनाची कागदपत्रे वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सदनिका किंवा प्लॉटधारकांना येथे विविध कामांसाठी खेट्या माराव्या लागतात. या संदर्भातील माहितीसाठी प्राधिकरणाचे अध्यक्ष दिलीप बंड असताना शाश्वत प्रकल्प सुरू केला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. प्राधिकरणाने आजवर ३४ गृहयोजना राबविल्या असून, बांधकाम केलेल्या सदनिकांची संख्या ११ हजार २२१ आहेत. तसेच वाणिज्य प्रयोजनाचे गाळे, २३१ असून ४५ भाजी विक्रीचे ओटे तयार केले आहेत. तर एकूण ६९७९ निवासी भूखंड आणि ७०५ व्यापारी आणि औद्योगिक भूखंडांची विक्री केली आहे. (वार्ताहर)