नवी मुंबईत ६८१ कोटींचा मालमत्ता कर घोटाळा
By admin | Published: January 26, 2017 04:41 AM2017-01-26T04:41:06+5:302017-01-26T04:41:06+5:30
महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील ६८१ कोटी, ६ लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी आयुक्त तुकाराम मुंढे
नवी मुंबई : महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील ६८१ कोटी, ६ लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने निलंबित मुख्य कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २० वर्षांत २६१८ एलयूसी (मोकळे भूखंड) मालमत्ताधारकांना बिलांचे वाटप न केल्यामुळे व कर वसूल न केल्याने पालिकेचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
गुन्हा दाखल केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रकाश कुलकर्णी यांच्यासह दिनेश गवारी व किशोर ढोले यांचा समावेश आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २ मे २०१६ रोजी पदभार स्वीकारण्यापूर्वीच मालमत्ता कर विभागाला भेट देऊन तेथील बेशिस्त कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली होती. मालमत्ता कर विभागाची वसुली व करआकारणीचा आढावा घेतल्याने अनियमितता आढळून आल्याने विभागाचे प्रमुख प्रकाश कुलकर्णी यांना २५ मे २०१६ रोजी निलंबित करून त्यांची चौकशी सुरू केली होती. लेखा परीक्षकाकडून पालिकेच्या स्थापनेपासूनचे व्यवहार तपासले असता ३३०१ एलयूसी मालमत्ताधारकांपैकी २६१८ मालमत्तांना २० वर्षांमध्ये बिले पाठविण्यात आली नाहीत व त्यांच्याकडून वसूल केली नसल्याने पालिकेचे ६८१ कोटी ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे मुंढे यांनी याविषयी ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. आयुक्तांच्या तक्रारीवरून ठाणे लाचलुचपत विभागाने एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे.