१७५ कोटींची मालमत्ता जप्त
By admin | Published: November 8, 2015 12:14 AM2015-11-08T00:14:51+5:302015-11-08T00:14:51+5:30
सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर उघडकीस आलेल्या सिन्नर येथील रेशन धान्य अपहारप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांत मोक्काअन्वये गुन्हा दाखल झालेल्या घटनेत जिल्हा
नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर उघडकीस आलेल्या सिन्नर येथील रेशन धान्य अपहारप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांत मोक्काअन्वये गुन्हा दाखल झालेल्या घटनेत जिल्हा प्रशासनाने मुख्य आरोपी असलेल्या घोरपडे बंधूंच्या सुमारे पावणेदोनशे कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली.
दोन पेट्रोलपंप, बारा वाहने, इमारती व अनेक रिकाम्या प्लॉट्सचा त्यात समावेश आहे. मोक्का न्यायालयाच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. गुन्हा घडल्यापासून फरार असलेले संपत घोरपडे, अरुण घोरपडे, विश्वास घोरपडे, रतन पवार व रमेश पाटणकर यांच्या मालमत्तेचा पोलिसांनी शोध घेऊन त्याची यादी न्यायालयाला सादर केली होती. सिन्नर तालुक्यातील रेशन दुकानासाठी पाठविण्यात आलेला तांदूळ दुकानात न पोहोचविता टेम्पोमध्ये भरून घोटी येथे नेत असताना पोलिसांनी पाठलाग करून वाडीवऱ्हे येथे पकडला होता. त्यावरून अगोदर संशयितांविरुद्ध जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार केल्याचा गुन्हा दाखल झाला़ नंतर मात्र शासनाने मोक्काअन्वये कारवाईचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशान्वये नाशिक, इगतपुरी, दिंडोरी व सिन्नर या चार तालुक्यांतील तहसीलदारांकरवी घोरपडे याच्या मालकीच्या जागा, प्लॉट, शेती, गाळे, इमारतींच्या सातबारा उताऱ्यावर मालमत्ता जप्तीचे शिक्के मारण्यात आले. (प्रतिनिधी)
- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर, दिंडोरी तालुक्यातील जमिनी, नाशिकमधील गाळे, आलिशान घर, फ्लॅट, तीन मजली इमारत, म्हसरूळ व सिडकोतील पेट्रोलपंप, चार मालट्रक, दोन रिक्षा, तीन दुचाकी, दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.