चीनच्या बुद्धावर मात करणार शिवस्मारक, 210 मीटरपर्यंत उंची वाढवण्याचा प्रस्ताव

By Admin | Published: March 25, 2017 01:49 PM2017-03-25T13:49:17+5:302017-03-25T13:55:17+5:30

शिवस्मारकाची उंची 192 मीटरऐवजी 210 मीटर करावी, असा प्रस्ताव राज्य सरकार केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठवणार आहे

The proposal to increase Shivammakar, height up to 210 meters, to overcome China's Buddha | चीनच्या बुद्धावर मात करणार शिवस्मारक, 210 मीटरपर्यंत उंची वाढवण्याचा प्रस्ताव

चीनच्या बुद्धावर मात करणार शिवस्मारक, 210 मीटरपर्यंत उंची वाढवण्याचा प्रस्ताव

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - मुंबईतील समुद्रात होणारं शिवस्मारक जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा व्हावं यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवस्मारकाची उंची 192 मीटरऐवजी 210 मीटर करावी, असा प्रस्ताव राज्य सरकार केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठवणार आहे. असं झाल्यास भारत चीनवर मात करत त्यांच्या सर्वांत उंच बुद्ध पुतळ्याचा रेकॉर्ड तोडेल. 
 
राज्य सरकार केंद्रीय पर्यावरण विभागाकडे यासंबंधी प्रस्ताव पाठवणार आहे. चीनचा सर्वात उंच पुतळ्याचा  दावा खोडून काढण्यासाठीच ही तयारी केली जात असल्याचं बोललं जात आहे. चीनमध्ये 2008 रोजी या पुतळ्याचं काम पुर्ण झालं होतं. या बुद्ध पुतळ्याची खरी उंची 153 मीटर होती, पण ज्या डोंगरावर हा पुतळा बांधण्यात आला आहे, त्याला 2008 रोजी पुनर्आकार देऊन चौथरा बनवला. त्यामुळे पुतळ्याची उंची 208 मीटर झाली. चीनच्या लुशान कौंटीमधील स्प्रिंग टेम्पल बुद्धा हा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. 
 
'आम्हाला जगातील सर्वात उंच शिवस्मारक हवं असल्याचं', शिवस्मारक समितीचे चेअरमन विनायक मेटे यांनी सांगितलं आहे. 'एकदा निविदा निघाल्यानंतर अंतिम निर्णय होईल तेव्हा 210 मीटर उंचीचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल. शिवाजी महाराज आमच्या आणि भविष्यातील पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. त्याचं भव्य शिवस्मारक बनवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करु', असंही ते बोलले आहेत.
 
अरबी समुद्रात उभारण्यात यावयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा खर्च ३६०० कोटी रुपयांवर गेला आहे. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या कामापोटी राज्य सरकारने निविदा काढल्या आहेत. 
 
२००९ मध्ये या स्मारकाचा खर्च ७०० कोटी रुपये इतका होता. २०१२ मध्ये या स्मारकासाठी निविदा काढण्यात आली होती, पण प्रत्यक्षात काम सुरू झालेच नाही. हे काम २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यासाठी सुमारे २ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. एकूण १५.९६ हेक्टर जागेवर भराव घालून हे स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
 
या शिवस्मारकासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचं जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पर्यटकांना शिवस्मारक पाहता यावं, यासाठी 180 मीटर उंचीवर जाणारी लिफ्ट असेल. बुर्ज खलिफा आणि स्टॅच्यू ऑप लिबर्टीप्रमाणे उंच ठिकाणाचा अनुभव येथे घेतला जाऊ शकतो असं एका अधिका-याने सांगितलं आहे. 
 
स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील 2500 कोटी रुपयांपैकी 1200 कोटी रुपये हे शिवाजी महाराजांच्या ब्रॉन्झच्या पुतळ्यासाठी असतील. मात्र प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्लॅन अजून निश्चित झालेला नाही. या टप्प्यात हेलिपॅड आणि आयमॅक्स थिएटर यांसारख्या सुविधा असाव्यात, असा प्रस्ताव आहे. या वर्षअखेरिस प्रकल्पाचं काम सुरु होणार असून काम पूर्ण होण्यासाठी 36 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार बनवणार आहेत.
 
शिवस्मारकासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ अरबी समुद्रात 16 एकर जमीन निवडली आहे. हे स्मारक सुमारे 309 फूट उंच असेल. समुद्रात तीन एकर क्षेत्रावर भर घालून चबुतरा उभारण्यात येणार आहे. त्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना शिवाजी महाराजांबाबतची माहिती देणारी दालने, पुस्तक प्रदर्शन, चित्रफीत दाखविण्यासाठी दालन, वस्तुसंग्रहालय आणि उद्यान असा आराखडा आहे.
 

Web Title: The proposal to increase Shivammakar, height up to 210 meters, to overcome China's Buddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.