पुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्यासाठी २७ हजार कोटींच्या प्रकल्पाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:17 AM2019-09-11T11:17:57+5:302019-09-11T11:20:30+5:30
कोल्हापूर : अतिवृष्टी होऊन पुराचे वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी बोगदा (टनेल)द्वारे दुष्काळी भागात नेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या ...
कोल्हापूर : अतिवृष्टी होऊन पुराचे वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी बोगदा (टनेल)द्वारे दुष्काळी भागात नेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी २७ हजार कोटींची आवश्यकता आहे. याचे सादरीकरण जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींसमोर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ यांनी राधानगरी धरण येथे केले. दरम्यान, जिल्ह्यात चार पथकांनी पूरग्रस्त भागात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
यानंतर जागतिक बॅँकेचे राज सिंग, रंजन समंतराय, युकियो टनाका यांनी राधानगरी धरण येथे भेट दिली. या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांनी भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे सादरीकरण करून माहिती दिली.
पुराचे सुमारे ११५ टीएमसी पाणी वाहून जाते, हे पाणी कुंभी, कासारी, वारणा, कोयना, कृष्णा, नीरा, भीमा या नद्यांमार्गे उजनी धरण येथे नेण्याचा हा प्रकल्प आहे; त्यासाठी २०१ कि. मी. अंतर लागणार आहे. दुष्काळ असलेल्या सांगलीतील पाच तालुके, साताऱ्यातील चार, सोलापुरातील ११, पुणे दोन, मराठवाड्यातील उस्मानाबाद येथील एका तालुक्याला याचा लाभ होईल. यामुळे सुमारे पाच लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावर या प्रकल्पाची संकल्पना चांगली असल्याचे जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
राधानगरी धरणाचे दरवाजे स्वयंचलित असल्याने १00 टक्के धरण भरल्यावरच ते उघडतात, असे पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर प्रतिनिधींनी ५० टक्के धरण भरल्यानंतर हे दरवाजे उघडता येतील, या पद्धतीने रचना असायला हवी, असे सांगितले; परंतु हे धरण हेरिटेज असल्याने ते शक्य नसल्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रतिनिधींनी २५ वर्षांत येणारा पूर डोळ्यासमोर ठेवून ५० वर्षांची ब्लू लाईन आखून नद्यांच्या परिसरातील कुटुंबांचे स्थलांतर करावे, असे मत मांडले; परंतु हे शक्य नसल्याचे पाटबंधारे अधिकाºयांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी जागतिक बॅँकेच्या व एशियन बॅँकेच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, आदी उपस्थित होते.
शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करून बॅँकेचे प्रतिनिधी उद्या, गुरुवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. पुराच्या पाण्याचा वापर कसा करता येईल, पुरामुळे रस्ते पाण्याखाली जाऊ नये, तसेच घरांचे नुकसान होणार नाही, या पद्धतीने घरांची निर्मिती, पूरग्रस्त भागात उड्डाणपूल बांधण्याची आवश्यकता आहे, यासंदर्भातील माहिती बॅँकेच्या प्रतिनिधींना दिली आहे, असे प्रवीणसिंह परदेशी यांनी पत्रकारांना सांगितले.
बँकेचे शिष्टमंडळ असे
पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची जागतिक बॅँकेचे प्रतिनिधी यांनी पाहणी केली. शिष्टमंडळात अनुप करनाथ, पीयूष शेखसरिया, पूनम अहलुवालिया, राज सिंग, रंजन सामंतराय, युकीओ टनाका, आय जसब्रँड एच. डी. जोंग, विजयशेखर कलवाकोंडा, इड्युरडो फेरियरा यांचा समावेश होता.
उड्डाणपुलाचा विषय ‘लोकमत’ने मांडला
पूरग्रस्त भागात उड्डाणपूल होणार अशा आशयाचे वृत्त ४ सप्टेंबरला ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या उड्डाणपुलासंदर्भात जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत चर्चा झाली.