एमआरव्हीसीचा रेल्वे अपघात रोखण्यास ५८0 कोटींचा प्रस्ताव
By admin | Published: September 25, 2016 12:56 AM2016-09-25T00:56:52+5:302016-09-25T00:56:52+5:30
रूळ ओलांडताना मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) सहकार्याने
मुंबई : रूळ ओलांडताना मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) सहकार्याने उपाय करीत आहे. यासाठी रूळ ओलांडणारी विविध स्थानकांमधील २२ धोकादायक ठिकाणे शोधली असून, त्यावर उपाययोजनांसाठी एमआरव्हीसीला तब्बल ५८0 कोटी रुपये खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला आहे. रूळ ओलांडण्याचे प्रकार थांबविण्यासाठी आधीच १२0 कोटी रुपयांचे नियोजन करून त्यातून स्थानकांवर विविध सुविधांचे कामही करण्यात येत आहे.
रेल्वे बोर्डातील अधिकाऱ्यांच्या एका समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीला मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुंबई पालिका, एमएमआरडीए, सिडको आणि शासनाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्यात आली.
यासंदर्भात मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी सांगितले की, रूळ ओलांडण्यात येत असलेल्या ठिकाणांच्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. अशा प्रकारची जवळपास १७४ ठिकाणे आहेत. त्याचप्रमाणे एमआरव्हीसी, रेल्वे प्रशासनाकडून आवश्यकता असेल अशा स्थानकांवर सरकते जिने, पादचारी पुलांच्या सुविधा देतानाच संरक्षक भिंत व कुंपणही बांधण्याचे नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)
एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय म्हणाले, रूळ ओलांडण्याचे प्रकार रोखण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. एमयूटीपी-२ अंतर्गत १२ स्थानकांवर सरकते जिने, पादचारी पूल, संरक्षक भिंत बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यावर काम सुरू असून, तब्बल १२0 कोटींचा खर्च आहे. याचबरोबर दोन स्थानकांमध्येही रूळ ओलांडण्याचे प्रमाण अधिक आहे. अशी २२ ठिकाणे शोधण्यात आली असून, एमयूटीपी-३ अंतर्गत संरक्षक भिंत, पादचारी पूल, कुंपण इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.