राज्यातील प्रत्येक विमानतळाच्या १०० किमी परिघात हेलिपॅड उभारण्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 03:06 AM2019-11-20T03:06:48+5:302019-11-20T03:06:56+5:30
अपघात, वैद्यकीय आणीबाणीच्या किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तातडीने विविध सुविधा उपलब्ध होण्यासाठी हवाई मार्गाने जोडले जाणे गरजेचे आहे.
- खलील गिरकर
मुंबई : राज्यातील नागरिकांना आणीबाणीच्या वेळी प्रसंगी हवाई सेवा उपलब्ध होण्यासाठी दीड ते दोन तासांपेक्षा जास्त प्रवास करावा लागू नये, यासाठी प्रत्येक विमानतळाच्या १०० किमीच्या परिघात किमान एक हेलिपॅड उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी ‘लोकमत’ला दिली.
अपघात, वैद्यकीय आणीबाणीच्या किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तातडीने विविध सुविधा उपलब्ध होण्यासाठी हवाई मार्गाने जोडले जाणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यात विमानतळाच्या परिघातील मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड किंवा हेलिपोर्ट उभारण्याचा एमएडीसीचा विचार आहे. मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात नवीन हेलिपॅड उभारण्यासाठी कंपनीने इच्छुकांकडून प्रस्ताव मागवले होते. सागरी मार्ग न्यायालयीन प्रक्रियेत अडकला असल्याने एमएमआरडीएने विरार-अलिबाग कॉरिडॉरमध्ये याबाबत तरतूद करून त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्याचे ठरवले आहे, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग विमानतळ मार्चपर्यंत सुरू होणार
२०१६ पर्यंत राज्यात मुंबई, नागपूर, पुणे व औरंगाबादला विमानतळ कार्यरत होते. तीन वर्षांत राज्यात शिर्डी, जळगाव, नाशिक, कोल्हापूर व नांदेड येथे विमानतळ कार्यान्वित करण्यात यश आले. पुढील पाच वर्षांत आणखी सहा विमानतळे कार्यान्वित करण्याचे ध्येय असून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती काकाणी यांनी दिली. त्यापैकी सिंधुदुर्ग येथील विमानतळ (चिपी) मार्च २०२० पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी आॅगस्टपर्यंत अमरावती, त्यानंतर पुरंदर, चंद्रपूर, नवी मुंबई, रत्नागिरी विमानतळाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.