मंत्रिमंडळ बैठकीत भगतसिंह कोश्यारींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; सरकारने मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 03:39 PM2023-02-14T15:39:20+5:302023-02-14T15:39:51+5:30
मंगळवारी झालेल्या बैठकीत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिनंदन करण्यात आले
मुंबई - महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अलीकडच्या काळात सातत्याने वादात राहिलेत. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे कोश्यारी यांच्याविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला. कोश्यारींच्या वादग्रस्त विधानांनी भाजपाचीही कोंडी झाली. त्यानंतर कोश्यारींना हटवण्याची मागणी जोर धरू लागली.
राज्यपालपदावरून भगतसिंह कोश्यारी पायउतार झाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोश्यारींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मंगळवारी झालेल्या बैठकीत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिनंदन करण्यात आले. राज्याचे हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल मंत्रिमंडळाने अभिनंदन प्रस्ताव मांडला होता. त्याला मंजुरी देण्यात आली.
वादग्रस्त विधानांमुळे कोश्यारी चर्चेत
महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे लहान वयात लग्न, गुजरातींनी पैसा काढून घेतला तर मुंबईत काही उरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या जमान्यातील आदर्श अशा विविध वक्तव्यांनी भगतसिंह कोश्यारी अडचणीत आले होते. विरोधकांसह अनेक संघटनांनी कोश्यारींच्या विधानाचा निषेध करत आंदोलन केले होते. कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवावं अशी मागणी होत होती. त्यानंतर नुकतेच भगतसिंह कोश्यारी यांच्या जागेवर रमेश बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?
वेगवेगळे राजकीय निर्णय आणि विधानांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरची कारकीर्द संपुष्टात आली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही सांभाळले होते.
२०१९ मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी आणि नंतर आलेले महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात घेतलेल्या विविध राजकीय भूमिका, रखडवून ठेवलेली १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती यामुळे भगतसिंह कोश्यारींवर टीका झाली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले विधान, तसेच महात्मा फुलेंबाबत काढलेल्या उदगारांमुळे कोश्यारी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.