राज्य सरकारकडे ‘एमपीएससी’ची पदे वाढविण्यासाठी प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 10:29 AM2023-12-08T10:29:16+5:302023-12-08T10:29:57+5:30
आयोगाचे करणार सक्षमीकरण, इतर राज्यांच्या आयोगांचाही अभ्यास, याअंतर्गत एमपीएससीच्या शिष्टमंडळाने ऑक्टोबर महिन्यात केरळ लोकसेवा आयोगाला भेट दिली होती.
मुंबई : ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) वाढलेल्या कामकाजाचा व्याप विचारात घेता मंजूर पदांच्या आराखड्यात वाढ करण्याचा आणि आयोगाच्या सक्षमीकरणाचा विचार आहे. तसा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, आयोगातर्फे राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.
आयोगाच्या कार्यपद्धतीत नवीन अद्ययावत प्रणालींचा समावेश करण्याच्या दृष्टीने ‘एमपीएससी’मार्फत देशातील इतर लोकसेवा आयोगांना भेटी देऊन त्यांच्याकडील काही चांगल्या, अद्ययावत प्रणालींचा अभ्यास करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत एमपीएससीच्या शिष्टमंडळाने ऑक्टोबर महिन्यात केरळ लोकसेवा आयोगाला भेट दिली होती. त्याचा अभ्यासपूर्वक अहवाल आयोगास सादर करण्यात आला असून, देशातील इतर लोकसेवा आयोगांनाही भेटी देण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती एमपीएससीच्या उपसचिवांनी दिली.
अधिकाऱ्यांची मंजूर पदे भरलेली, पण...
एमपीएसतील अधिकाऱ्यांची मंजूर असलेली सर्व पदे भरलेली आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांमधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची नामनिर्देशनाने भरावयाची १६ पदे रिक्त आहेत. त्याकरिता २०२२च्या परीक्षेमधून ७ पदे, २०२३च्या परीक्षेतून ८ पदे व २०२४ च्या परीक्षेमधून १ पद भरण्याकरिता मागणीपत्र पाठविण्यात आले आहे.
५,१५१ पदांची शिफारस
एमपीएससीकडून २०२० पासून आजपर्यंत ५,१५१ पदांची शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. जवळपास २५० पेक्षा जास्त जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही, असा दावा आयोगाच्या उपसचिवांनी केला आहे.