प्रपोझ डे अन् ब्रेकपडे

By admin | Published: February 18, 2017 11:27 PM2017-02-18T23:27:41+5:302017-02-18T23:27:41+5:30

- फिरकी

Propose Day and Breakpade | प्रपोझ डे अन् ब्रेकपडे

प्रपोझ डे अन् ब्रेकपडे

Next

तरुणाईचा ‘व्हॅलेंटाईन डे’ जवळ आला तसा षोडशवर्षीय कॉलेजकन्यकांची कोवळ्या मिसरुडवाल्यांसोबत रोज एक ‘डे’ साजरा करण्याची घाई सुरू झालेली. अशातच यंदा ‘भगवं उपरणं’वाल्यानांही केवळ ‘खुर्ची डे’चे वेध लागल्यानं पोरा-टोरांना जणू रानच मोकळं मिळालेलं... म्हणूनच की काय ‘कोलांटवाडी’चं ज्युनियर कॉलेज दोन-तीन दिवसांपासून मोकळं पडलेलं. गेल्या तीन वर्षांपासून अवघ्या पाच हजारांच्या मानधनावर मनोभावे प्रोफेसरकी करणारे गोंधळे सर माश्या मारून कंटाळलेले. अखेर शेजारच्या वर्गातल्या वेंधळे सरांना सोबत घेऊन फाटकाबाहेरच्या कॅन्टीनवर गेले. चहा घेता-घेता वेगवेगळ्या ‘डे’चा विषय निघाला.
‘काही पण म्हणा सर.. पूर्वी तारीख पे तारीख असायची. आता डे बाय डेचा धुमाकूळ सुरू झालाय; आपली सारी पोरं बिघडली यामुळं,’ वेंधळे सरांचं बोलणं ऐकून कॅन्टीनवाला हसला, ‘अवोऽऽ सर... प्वारांचं काय घिऊनशान बसलाव? चांगली-चुंगली नेते मंडळीबी रोज येक डे साजरा करू लागल्याती. जरा फिरा की त्यांच्यामंदी, म्हंजी तुमास्नी समजंल संमदं राजकारण बगाऽऽ’
... मग काय. ‘गोंधळे अ‍ॅन्ड वेंधळे’ टीम गावाबाहेर पडली. रोज एकेक नेत्याला भेटू लागली, तेव्हा यातून उलगडत गेली नव-नवी राजकीय कहाणी.
पहिला दिवस : रोझ डे
सांगली जिल्ह्याच्या सीमेवर ‘खोतांचे सागर’ अन् ‘देशमुखांचे सत्यजित’ गप्पा मारत उभारलेले. ‘नेत्यांची नवी पिढी राजकारणात पुढं आलीच पाहिजे,’ यावर दोघांची चर्चा सुरूअसतानाच कऱ्हाडहून ‘पाटलांचे प्रताप’ही तिथं आले. त्यांच्या हातात गुलाबाची फुलं होती, ‘आमच्या आनंदनानांनी सांगितलंय, नाराज कार्यकर्त्यांना फुलं द्या. रोझ डे साजरा करा.’
हे पाहून कागलहून आलेल्या ‘घाटगेंच्या अंबरीश’नी हातातलं नारळ कोपऱ्यात फेकून दिलं, ‘निष्ठावान कार्यकर्त्यांच्या हातात निरोपाचा नारळ देण्याऐवजी फूल कधीही चांगलं,’ हा त्यांचा डॉयलॉग बाकीच्या साऱ्याच नेतेपुत्रांना आवडला. प्रोफेसरांची जोडगोळी पुढं सरकली.
दुसरा दिवस : प्रपोज डे
पेठनाक्यावर लाल दिव्याची गाडी थांबलेली. आतमध्ये चंद्रकांतदादा ‘थ्रीडी दुर्बिण’ घेऊन एकाचवेळी तीन जिल्ह्यांवर नजर लावून बसलेले. ‘पंचगंगा, कृष्णा अन् कोयना’ या तीन नद्यांच्या खोऱ्यातून अजून कोण-कोण आपल्यासोबत येणार, याचा अंदाज बांधू लागलेले. त्यांनी म्हणे भेटेल त्याला पक्षात येण्याचं ‘प्रपोजल’ दिलेलं. कारण येत्या अडीच वर्षांत कोणत्याही परिस्थितीत त्यांना दक्षिण मुलुखात स्वत:चा नवा ‘पाटील गट’ स्ट्राँग करायचा होता. बराचवेळ ते वाट बघत राहिले. मात्र, कुणीच आलं नाही. तेव्हा त्यांचा पीए कुजबुजला, ‘दादाऽऽ ‘जय महाराष्ट्र’वाल्यांच्या खिशातले राजीनाम्याचे बॉम्ब फुटणार की काय म्हणून भीतीनं एकजण पण आपल्याकडं यायला तयार नाही बहुतेक. आजचा ‘प्रपोज डे’ फुकटच गेला. चलाऽऽ आपापल्या कामाला लागू या.’
तिसरा दिवस : चॉकलेट डे
प्राध्यापक महाशयांची जोडगोळी तिथून हलली. वाटेत ‘सदाभाऊ’ भेटले. त्यांचे सारे खिसे चॉकलेटनं भरलेले. त्यांना म्हणे देवेंद्रपंतांनी हे सारे ‘चॉकलेटस्’ दिलेले. गोंधळेंनी विचारलं, ‘भाऊऽऽ अनेक शेतकऱ्यांचा ऊस अजून शिवारातच पडून राहिलाय, तरीही कारखाने बंद झालेत. तुम्ही आवाज उठविंणार की नाही?’ ..तेव्हा काकुळतीनं कसानुसा चेहरा करत भाऊंनी गालाकडं बोट केलं.. कारण तोंडातही चॉकलेटचाच तोबरा भरल्यानं ‘भाऊंचा आव्वाऽऽज’ पुरता बंद झाला होता. यामुळं या विचित्र ‘चॉकलेट डे’ ला दाद देत जोडगोळी निघाली.
चौथा दिवस : टेडी डे
पुढं बऱ्याच बायका जमलेल्या. निंबाळकरांच्या शिवांजलीराजे, नाईकांच्या अनन्याताई, मानेंच्या वेदांतिकादीदी, देसार्इंच्या अर्चनाबाई अन् कदमांच्या वैशालीताई गप्पा मारत उभारलेल्या. यंदाच्या हळदी-कुंकवाला रूमाल-पर्सचं वाण देण्याऐवजी प्रचारपत्रक वाटायला निघालेल्या. ‘किचनमध्ये तेलाला फोडणी देण्यापेक्षा स्टेजवर प्रचाराचं भाषण ठोकणं खूप सोप्पं!’ यावर साऱ्याजणींचंच एकमत होत असताना ‘महाडिकांच्या शौमिकाताई’ तिथं आल्या. त्यांनी मात्र मोठ्या ठसक्यात सांगितलं, ‘नव्या वादाला फोडणी देण्याचं काम माझे सासरे जेवढं छान करतात, त्याहीपेक्षा चांगलं भाषण माझे मिस्टर करतात!’ या विषयावरून वाद वाढू लागला, तसं साऱ्याजणींनी एकमेकींना ‘टेडी’चं कि-चेन देऊन निरोप घेतला. ‘निर्जिव टेडीसारखं आपण पुढची पाच वर्षे काम करायचं नाही,’ असा निर्धारही त्यांनी या ‘टेडी डे’ ला घेतला.
पाचवा दिवस : हग डे
जोडगोळी फिरत-फिरत साताऱ्यात आली. तिथं ‘थोरले राजे’ दिसेल त्याला मिठ्या मारत होते. लाडानं पप्पी घेत होते. हे पाहून जोडगोळी दचकली, ‘आज ‘हग डे’ आहे म्हणून हे महाराज सर्व कार्यकर्त्यांना जादू की झप्पी देताहेत की काय ?’ या त्यांच्या प्रश्नावर ‘पाटलांच्या निशांत’नी हळूच हसत उत्तर दिलं, ‘आमच्या महाराजांचा बारा महिने हग डे असतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम?’ साताऱ्याच्या या जगावेगळ्या प्रॉब्लेमबद्दल काहीच बोलायची सोय नसल्यानं जोडगोळी गुपचूप तिथून सटकली.
सहावा दिवस : मिसिंग डे
वाटेत तासगावजवळ ‘काकांचे काका’ भेटले. संजय काकांच्या जुन्या कार्यकर्त्यांबरोबर ‘मिसिंग डे’ साजरा करत होते. म्हणजे ज्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांचं उगी-उगी सांत्वन करत होते. विशेष म्हणजे, या मंडळींवर ‘जयंतरावां’चंही बारीक लक्ष होतं. त्यांनी हळूच निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये हूल उठवली की, ‘काकांचे काका तुमच्यासोबत एक दिवस ‘किक डे’ही साजरा करणार.’
शेवटचा दिवस : ब्रेकअप डे
हे ऐकताच ‘आयाराम-गयाराम’ गटात अस्वस्थता पसरली. एकानं संजयकाकांना मोबाईलही लावला, मात्र त्यांनी नेहमीप्रमाणं उचलला नाही. कार्यकर्त्यांची अस्वस्थता अधिकच वाढली. चुळबूळ सुरू झाली. सांगलीतल्या संभाजी पैलवानांच्या भाषेतच बोलायचं झालं तर तंबूतल्या उंटानं बांबूसह साऱ्याच कापडाची वाट लावली होती. त्यामुळं ‘तंबूतली पहिली टीम पुन्हा आपल्या वाड्यावर येणार,’ अशी घोषणा जयंतरावांनी केली होती. खरंतर, या बोलण्यात आत्मविश्वास नसला तरी उसनं अवसान होतं, कारण एकवीस तारखेला मतदान होतं. त्याच दिवशी ‘बे्रकअप डे’ही होता. त्यामुळं नक्कीच त्या दिवशी ‘आयाराम-गयारामांची ‘ब्रेकअप पार्टी’ साजरी होईल, असा त्यांना विश्वास होता. --- सचिन जवळकोटे

Web Title: Propose Day and Breakpade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.