राणी बागेच्या प्रवेश शुल्कात प्रस्तावित वाढ अडचणीत
By admin | Published: May 16, 2017 09:24 PM2017-05-16T21:24:25+5:302017-05-16T21:24:25+5:30
भाजपच्या विरोधानंतरही भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या (राणीबाग)प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावावर सत्ताधारी ठाम
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - भाजपच्या विरोधानंतरही भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या (राणीबाग)प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावावर सत्ताधारी ठाम आहे. प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर पालिका प्रशासनाच्या पटलावर आणला. पेंग्विनच्या देखभालीसाठी पालिकेच्या तिजोरीवर भार पडणार असल्याने ही शुल्क वाढ करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद प्रशासनाने केला आहे. त्याचवेळी ही दरवाढ रद्द करण्यासाठी सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशन कंबर कसली आहे. या विरोधात वेळ पडल्यास कायदेशीर लढा देण्याची तयारीही या संस्थेने केली आहे. तर विरोधी पक्षांसह भाजपनेही या शुक्लवढीला रेड सिग्नल दाखवला असल्याने स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे.
राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात बाजार व उद्यान समितीमध्ये मंजूर झाला. यावरून भाजप आणि शिवसेना आपसाद भिडले आहेत. ही दरवाढ होऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे. तरीही सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासनाने शुक्रवारी स्थायी समितीपुढे शुल्कवाढीचा प्रस्ताव आणला आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ झालेली नाही. पेंग्विनच्या देखभालीचे कामं सध्या ठेकेदार करीत असून लवकरच पालिकेकडे स्थलांतरित करण्यात येणार आहे. याचा भार पालिकेच्या तिजोरीवर पडेल, असे या शुल्कवाढीचे समर्थन प्रशासनाने केले आहे. त्यानुसार प्रवेश शुल्कात २० पट वाढ करण्याचे प्रस्तावित आहे.
प्रस्ताव अडचणीत
राणीबागेच्या शुल्कात वाढ करण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी वादळी चर्चा होण्याचे संकेत आहे. मात्र ही दरवाढ म्हणजे मुंबईकरांच्या खिशात हात घालण्यासारखे असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच विरोधी पक्षांनीही विरोधाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर मतदान घेणे शिवसेनेला भाग पडणार आहे. मात्र भाजपचे संख्याबळ समान असल्याने विरोधकांच्या मदतीने हा प्रस्ताव फेटाळून भाजप शिवसेनेला मात देण्याची शक्यता अधिक आहे.
सामाजिक संस्थांचा विरोध
विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी एकत्रित येऊन स्थापन झालेल्या सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशन या संस्थेने ही शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. हा कसला पारदर्शक कारभार? या शुल्कवाढीच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या उत्पन्नाचा खर्च राणीबागेतील उद्यान आणि प्राणिसंग्रहालयावर करण्याची तरतूद पालिकेच्या नियमात नाही. राणी बागेत पूर्वीपासूनच हजारोंच्या संख्येने पर्यटक येत आहेत. पेंग्विनमुळे पर्यटकांचा आखाडा वाढल्याची धूळफेक प्रशासन करीत आहेत, असा आरोप या संस्थेचे पदाधिकारी व माजी पालिका आयुक्त द.मा.सुखटणकर यांनी आज पत्रकार परिषदेतून केली. सध्या संस्थेमार्फत कायदेशीर बाबी तपासून घेण्यात येत असून वेळ पडल्यास ही दरवाढ रद्द करण्यासाठी कायदेशीर लढा लढणार असल्याचे यावेळी संस्थतर्फे सांगण्यात आले.
* स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर झाल्यास महापालिकेच्या महासभेत पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. तिथेही मंजुरी मिळाल्यानंतर त्या महिन्याच्या नंतरच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ही शुल्कवाढ लागू होणार आहे.
* पेंग्विन आणल्यापासून दररोज १५ ते २० हजार पर्यटक राणी बागेत येतात. सुट्टीच्या दिवशी हा आखाडा ३५ हजारपर्यंत पोहोचतो. असा पालिकेचा दावा आहे. मात्र राणीच्या बागेत फार पूर्वीपासून दररोज आठ ते दहा हजार पर्यटक येत असतात, असे सामाजिक संस्थांनी निदर्शनास आणले आहे.
राणीबाग प्रवेश व पेंग्विन दर्शनासाठी एकत्रित शुल्क
१२ वर्षांवरील व्यक्तींसाठी : १00 रुपये
तीन ते १२ वयोगटांतील मुलांसाठी : २५ रुपये
कुटुंबासाठी : दोन प्रौढ व तीन ते १२ वर्षांपर्यंतची दोन मुले : १00 रुपये
अतिरिक्त प्रत्येक तीन वर्षांवरील मुलांसाठी २५ रुपये व १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी १00 रुपये.
शालेय विद्यार्थ्यांसाठी -
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : निशुल्क.
खासगी शाळांतील तीन ते १२ वर्षांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : १५ रुपये.
खासगी शाळांतील १२ वर्षांवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : २५ रुपये.
सकाळी सहा ते आठपर्यंत चालण्यासाठी : मासिक १५0 रुपये. संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत फेरफटका बंद.
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी : निशुल्क
फोटोग्राफी पेंग्विन कक्ष वगळता : १00 रुपये
व्हिडीओ शूटिंग पेंग्विन कक्ष वगळता : ३00 रुपये
परदेशी पर्यटकांसाठी -
१२ वर्षांवरील व्यक्तीसाठी : ४00 रुपये.
तीन ते १२ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी : २00 रुपये