राज्यातील ११ शहरे रेल्वेने जोडण्याचा प्रस्ताव; तुमचेही आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 07:29 AM2022-12-15T07:29:53+5:302022-12-15T07:41:56+5:30
देशातील वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाहनांची वाढती संख्या आताच रहदारीची मुख्य समस्या बनली आहे.
- रमाकांत पाटील
लाेकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गतिशक्ती योजनेंतर्गत ५० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील ८० शहरे रेल्वे सेवेने जोडण्याचा विचार रेल्वे प्रशासनाने सुरू केला असून त्यात महाराष्ट्रातील ११ शहरांचा समावेश आहे. या सेवेसाठी प्राथमिक सर्वेक्षण सुरू झाले असून प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत.
देशातील वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाहनांची वाढती संख्या आताच रहदारीची मुख्य समस्या बनली आहे. आगामी काळात हा प्रश्न अधिकच जटील होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेनेही नवीन शहरे रेल्वे सेवेने जोडण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी गतिशक्ती योजना सुरू करण्यात आली आहे.
ही ११ शहरे जोडणार
महाराष्ट्रातील ५० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली संगमनेर (जि. अहमदनगर), सिल्लोड (जि. औरंगाबाद), अंबेजोगाई (जि. बीड), बुलढाणा, चिखली (जि. बुलढाणा), चोपडा (जि. जळगाव), देगलूर (जि. नांदेड), शहादा (जि. नंदुरबार), सिन्नर (जि. नाशिक), उरण इस्लामपूर (जि. सांगली), पुसद (जि. यवतमाळ) ही ११ शहरे रेल्वे मार्गाने जोडण्याचा प्रस्ताव आहे.