वकिली वेशात स्वत:चा खटला स्वत:च लढणाऱ्याला कैद

By admin | Published: January 16, 2015 12:57 AM2015-01-16T00:57:45+5:302015-01-16T00:57:45+5:30

वकील नसताना वकिली वेशात स्वत:चा खटला स्वत:च चालविणाऱ्या एका आरोपीला बनावट दस्तऐवजावर दुसऱ्याला विकलेली वडिलोपार्जित मालमत्ता हडपण्याच्या प्रकरणात गुरुवारी मुख्य

Prosecution of a lawyer who himself fights himself in a lawyer's case | वकिली वेशात स्वत:चा खटला स्वत:च लढणाऱ्याला कैद

वकिली वेशात स्वत:चा खटला स्वत:च लढणाऱ्याला कैद

Next

न्यायालय : प्रकरण बनावट दस्तावेजावर मालमत्ता हडपण्याचे
नागपूर : वकील नसताना वकिली वेशात स्वत:चा खटला स्वत:च चालविणाऱ्या एका आरोपीला बनावट दस्तऐवजावर दुसऱ्याला विकलेली वडिलोपार्जित मालमत्ता हडपण्याच्या प्रकरणात गुरुवारी मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. सी. राऊत यांच्या न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
विवेक रामदास मोकदम (५४), असे या आरोपीचे नाव असून तो गांधीनगर येथील रहिवासी आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, विवेकचे वडील रामदास मोकदम यांनी १२ आॅगस्ट १९९४ रोजी आपला गांधीनगर येथील ४२९.१२ चौरस मीटरचा भूखंड रवी शर्मा नावाच्या एका बिल्डरला पाच लाख रुपयात विकला होता. विवेकने या मालमत्तेत आपला हिस्सा असल्याचा दावा करून आपल्या वडिलांविरुद्ध न्यायालयात खटला भरला होता. त्यावेळी खुद्द वडिलांनी विवेकसोबत समझोता करून त्याला २ लाख रुपये दिले होते. समझोत्याच्या वेळी विवेकने आपण या मालमत्तेतून आपला हक्क सोडत असल्याचे लिहून दिले होते.
रामदास मोकदम यांनी रवी शर्मा यांच्याकडून भूखंडाचे पूर्ण पैसे घेतले होते. केवळ विक्रीपत्र करणे बाकी होते. दुर्दैवाने २७ फेब्रुवारी २००० रोजी रामदास मोकदम यांचा मृत्यू झाला होता. रवी शर्मा यांना या ठिकाणी फ्लॅट स्किम उभी करायची होती. इच्छूक फ्लॅटधारकांनी त्यात पैसा गुंतवला होता. परंतु विलंबामुळे शर्मा यांना लोकांनी पैसे परत मागितले होते. त्यामुळे शर्मा यांनी हा भूखंड ९ लाख रुपयात सुकुमार इंदनलाल नशिने यांना विकला होता. मृत्यूपूर्वी ही मंजुरी खुद्द रामदास मोकदम यांनी दिली होती. दरम्यान विवेकला या भूखंडाचे विक्रीपत्र झाले नाही याबाबतची माहिती होती. गैरफायदा घेऊन त्याने आई कमला आणि बहीण विभा यांना अंधारात ठेवून हक्क सोडण्याबाबतचे त्यांचे बनावट लेख तयार केले होते. ते नासुप्र आणि मनपा कार्यालयातही दाखल केले होते. त्यानंतर त्याने रजिस्ट्री करून हा भूखंड सहा वेळा सहकारी बँकांमध्ये गहाण ठेवून लाखोचे कर्ज उचलले होते.
आपली फसवेगिरी झाल्याचे लक्षात येताच नशिने यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यावरून विवेक मोकदमविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक हरिगणेश वांदिले आणि त्यानंतर प्रभाकर धोटे यांनी केला होता. आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात खटला चालून ७ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला या तिन्ही गुन्ह्यात प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावास, प्रत्येकी १ हजार रुपये दंड सुनावण्यात आला. या सर्व शिक्षा आरोपीला एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने सरकारी वकील विजयालक्ष्मी अडगोकर यांनी काम पाहिले. आरोपीने स्वत:चा खटला स्वत:च लढला. (प्रतिनिधी)
शिक्षेच्या वेळीही वकिली वेशातच
विवेक मोकदमला शिक्षा झाली तेव्हा तो न्यायालयात वकिलाच्या वेशातच होता. वकिलाला शिक्षा झाल्याची वार्ता संपूर्ण जिल्हा न्यायालयात पसरली. डीबीए च्या निवडणुकीचे दिवस असल्याने ही वार्ता ऐकून वकील मंडळी आपला प्रचार अर्धवट सोडून त्यांनी मोकदमकडे धाव घेतली. त्यानंतर तो वकील नसल्याचे समजले. तो वकील नाही, परंतु तो स्वत:चे सर्वच प्रकारचे खटले स्वत: लढतो, असे सरकारी वकिलाकडून सांगण्यात आले.

Web Title: Prosecution of a lawyer who himself fights himself in a lawyer's case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.