मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूरसह दोघांना खटल्यास गैरहजर राहण्याची मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 06:19 AM2019-05-22T06:19:28+5:302019-05-22T06:19:47+5:30
प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि सुधाकर चतुर्वेदी यांनी खटल्यास गैरहजर राहण्यासंदर्भात त्यांच्या वकिलांमार्फत विशेष न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी होती.
मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि सुधाकर चतुर्वेदी यांना आठवडाभर खटल्याला गैरहजर राहण्याची परवानगी विशेष एनआयए न्यायालयाने सोमवारी दिली.
प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि सुधाकर चतुर्वेदी यांनी खटल्यास गैरहजर राहण्यासंदर्भात त्यांच्या वकिलांमार्फत विशेष न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी होती.
ठाकूर, चतुर्वेदी यांनी आपण लोकसभेच्या निकालाची तयारी करीत असल्याने न्यायालयात उपस्थित राहू शकत नाही, असे सांगितले. तर पुरोहितने वैयक्तिक कारणामुळे आपण खटल्याला उपस्थित राहू शकत नाही, असे सांगितले. त्यांचा अर्ज मान्य करीत न्यायालयाने खटल्यास हा आठवडा अनुपस्थित राहण्याची मुभा दिली.
दरम्यान, न्यायालयाने बचावपक्षाच्या वकिलांना घटनास्थळी म्हणजेच मालेगावला भेट देण्याची परवानगी दिली. विशेष न्यायालयाने गेल्या आठवड्यात खटल्यादरम्यान आरोपी उपस्थित राहात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत सर्व आरोपींना खटल्यादरम्यान उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते. भोपाळमधून भाजपची उमेदवारी मिळालेल्या ठाकूर यांनी आपल्याला लोकसभा निवडणूक निकालापूर्वी काही औपचारिकता पार पाडायची असल्याचे न्यायालयाला सांगितले. तर उत्तर प्रदेशमधून स्वतंत्र निवडणूक लढविणाऱ्या चतुर्वेदीनेही हेच कारण दिले.
साक्ष नोंदवण्याचे काम सुरू
सध्या न्यायालय साक्षीदारांच्या साक्ष नोंदवित आहे. ठाकूर, चतुर्वेदी आणि पुरोहित यांच्यासह मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी यांचीही जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या सर्व आरोपींवर बेकायदा हालचाली (प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत व भारतीय दंडसंहितेअंतर्गत खटला भरविला आहे.