समृद्धी महामार्ग विकासाची वाहिनी ठरणार !

By admin | Published: October 7, 2016 07:03 PM2016-10-07T19:03:58+5:302016-10-07T19:03:58+5:30

गाव व शहरांचा कायापालट करण्याच्या दृष्टिने रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नातून नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग

The prosperity of the highway will be the channel of development! | समृद्धी महामार्ग विकासाची वाहिनी ठरणार !

समृद्धी महामार्ग विकासाची वाहिनी ठरणार !

Next
>ऑनलाइन लोकमत
 
वाशिम, दि. 07 -  गाव व शहरांचा कायापालट करण्याच्या दृष्टिने रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नातून नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग प्रस्तावित असून, शेतकºयांसह सर्वांसाठीच हा महामार्ग विकासाची वाहिनी ठरणार, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वाशिम येथे २३५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा तसेच शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
स्थानिक पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे शुक्रवारी आयोजित या सोहळ्याला राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, नगर विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, खासदार संजय धोत्रे, आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक, अमित झनक, गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, डॉ. सुनील देशमुख, आमदार रायमूलकर, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकाºयांची उपस्थिती होती. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्रशासकीय अधिकाºयांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते २३५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकरी विकासाला केंद्रबिंदू मानून सरकारने विविध उपक्रम व योजना अंमलात आणल्या आहेत. जलयुक्त शिवार योजनेतून राज्यात जलक्रांती होत असून, दुष्काळाचे चटके सोसणारी दोन हजार गावे आता दुष्काळमुक्त झाली आहेत. येत्या तीन वर्षात राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शेतक-यांना  सुजलाम् सुफलाम् दिवस आणण्यासाठी नागपूर ते मुंबई असा समृद्धी महामार्ग प्रस्तावित असून, यामध्ये विदर्भात सर्वाधिक लाभ वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना होणार आहे. या महामार्गामुळे वाशिमचे शेतकरी आपला शेतमाल सहा ते सात तासात मुंबई येथील बंदरामध्ये (जेएनपीटी) पोहोचवू शकतील. येथून जगाच्या पाठिवर कुठेही शेतमाल पाठवू शकणार असल्याने शेतकºयांचा खºया अर्थाने विकास साधला जाईल. तसेच या महामार्गादरम्यानच्या कृषी समृद्धी हबमध्ये शेतकºयांना भागीदार करून घेतले जाणार असल्याचे सांगत, या महामार्गाला विरोध केला तर शेतकरी सर्वांगीन समृद्धीपासून वंचित राहतील, अशी भीतीही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी आमदार लखन मलिक यांनी एकबुर्जी धरण उंचीसंदर्भात, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी समृद्धी महामार्गासह अमरावती विद्यापीठ उपकेंद्र वाशिम येथे देण्याची मागणी केली. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थेबाबत विचार व्यक्त केले. तर कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी मराठवाडा विभागाच्या धर्तीवर, नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे न करता विदर्भातील शेतकºयांना भरीव मदत दिली जाईल, अशी घोषणा केली. तसेच विविध कृषी योजनांसंदर्भात माहिती देत शेतकºयांना वीज द्या, पाणी द्या; दुसरे काहिही नको, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तर आभार बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी काशीनाथ गाडेकर यांनी मानले.
 
आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीने दखल !
या सोहळ्याचे मुख्य आयोजक तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांचा उल्लेख ‘कार्यप्रबळ, धडाडीचे आमदार’ असा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरूवातीलाच पाटणी यांच्या विकास कामांबाबतच्या ‘तळमळी’चे तोंडभरून कौतुक केले. तसेच पाटणी यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्यांना फडणवीस यांनी तातडीने मंजूरात दिली. यामध्ये विजेच्या सुविधेसाठी ७० कोटी रुपये मागितलेले असताना, मुख्यमंत्र्यांनी ११४ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. नद्यांचे खोलीकरण व रूंदीकरणाचा मुद्दाही गांभीर्याने घेत लोकसहभाग, स्वयंसेवी संस्था व शासनाच्या सहकार्यातून वाशिम जिल्ह्यातील नद्यांचे पुनरूज्जिविकरण केले जाईल, अशी ग्वाही दिली. मानव विकास निर्देशांकात वाशिमचा असलेला ३३ वा क्रमांक लवकरच २०-२५ च्या दरम्यान आणण्यासाठी ठोस पावले उचलले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.  तसेच या दरम्यान आमदार राजेंद्र पाटणी यांनी जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून विविध प्रश्न मांडले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सदर प्रश्न लवकरच निकाली काढण्याचेही आश्वासन दिले.

Web Title: The prosperity of the highway will be the channel of development!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.