पर्यटनाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय
By admin | Published: August 10, 2015 12:07 AM2015-08-10T00:07:33+5:302015-08-10T00:07:33+5:30
पन्हाळ्याजवळ कारवाई : आठजणांना अटक; कर्नाटकातील मंत्र्याच्या स्वीय सहायकाचा समावेश
कोल्हापूर : पन्हाळ्याच्या पायथ्याला आणि दरी-डोंगरांच्या जंगलात इंजोळेपैकी खडेखोळवाडी येथील आलिशान फार्महाऊसवर ‘पर्यटन केंद्रा’च्या नावाखाली हायफाय वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या अड्डामालक बाबासाहेब कोंडे, चालक टीना पंडित यांच्यासह आठजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल
जप्त केला.अटक आरोपींपैकी संशयित किरणसिंग राजपूत हा कर्नाटकातील वजनदार मंत्र्यांचा स्वीय सहायक, तर अन्य तिघेजण कर्नाटकातील मंत्रालयात उच्चपदावर अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. चार वर्षांपासून हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संशयित बाबासाहेब दिनकर कोंडे (वय ४२, रा. इंजोळे, ता. पन्हाळा), टीना ऊर्फ नर्मिता दैनंदिन पंडित (४०, कोल्हापूर, मूळ बालेश्वर, ओरिसा), किरणसिंग बाळाराम राजपूत (३०, रा. यमकनमर्डी, जि. बेळगाव), आप्पासाहेब रामगोंडा पाटील (४०, रा. संकेश्वर-अंकली, जि. बेळगाव), मंजुनाथ प्रकाश कलगुटकी (३३, रा. गावठाण, जि. बेळगाव), नागराज हणमंतया (३९, रा. बंगलोर), हेमंत गोरूर रामाईगौंडा (३५), शिवनगौंडा यलाप्पागौडा पाटील (३७), अरुण मल्लाप्पा मुस्लिमारी (३४, रा. बंगलोर) अशी त्यांची नावे आहेत. सर्वांना पन्हाळा न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविली. पीडित पाच तरुणींची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे. नागराज हणमंतया, हेमंत रामाईगोंडा व अरुण मुस्लिमारी हे कर्नाटकातील मंत्रालयात उच्चपदावर अधिकारी आहेत तसेच मंजुनाथ कलगुटकी व्यापारी आहे. आप्पासाहेब पाटील, शिवनगौंडा पाटील बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून विदेशी मद्य, रोख रक्कम, साऊंड सिस्टीम, मोबाईल हँडसेट यासह तीन चारचाकी वाहने जप्त केली.
खडेखोळवाडी येथे बाबासाहेब कोंडे याचे कृषी पर्यटन केंद्र आहे. याठिकाणी त्याने फार्महाऊस बांधले आहे. गेल्या चार वर्षांपासून त्याने येथे टीनाच्या मदतीने सांस्कृतिक नृत्याच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू केला होता. त्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री फार्महाऊसवर छापा टाकून पीडित तरुणींसह आठजणांना अटक केली.
दरम्यान, अंधारात १० ते १५ लोक बॅटरीच्या प्रकाशात फार्महाऊसच्या दिशेने येत असल्याचे अड्डामालक कोंडे याला दिसताच त्याने सुरक्षारक्षकासह तेथून पळ काढला. तो थेट इंजोळे येथील घरी येऊन लपला होता. त्याला मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले.
कारवाईची माहिती समजताच निपाणीतील काही कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक मोहिते यांना कारवाई करू नका, किरणसिंग राजपूत हा कर्नाटकातील एका मंत्र्यांचा खासगी सहायक असल्याचे सांगितले; परंतु पोलिसांनी त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत कारवाई करून आरोपींना पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात चार ठिकाणी अड्डे
फार्महाऊसच्या नावाखाली जिल्ह्यात चार ठिकाणी वेश्याव्यवसाय चालविला जात आहे. अन्य तीन ठिकाणीही अशा पद्धतीने व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अड्डाचालक टीना पंडित ही चार फार्महाऊसवर नेटवर्क चालवत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.