सागरी शिवस्मारकापेक्षा गड टिकवा
By Admin | Published: February 22, 2016 02:14 AM2016-02-22T02:14:13+5:302016-02-22T02:14:13+5:30
राज्यातील गडकिल्ले पुढच्या पिढीने पाहिले पाहिजेत. तेथे गिर्यारोहकांचा राबता असेल तरच ते शक्य होईल. समुद्रात पुतळा बांधण्यापेक्षा गडकिल्ले टिकविणे गरजेचे आहे़ हीच शिवाजी महाराजांची
पुणे : राज्यातील गडकिल्ले पुढच्या पिढीने पाहिले पाहिजेत. तेथे गिर्यारोहकांचा राबता असेल तरच ते शक्य होईल. समुद्रात पुतळा बांधण्यापेक्षा गडकिल्ले टिकविणे गरजेचे आहे़ हीच शिवाजी महाराजांची स्मारके आहेत, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले़
‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट आॅफ माउंटेनिअरिंग’च्या वतीने ज्येष्ठ गिर्यारोहक एऩ के. महाजन आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना रविवारी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ पुतळे बांधणे ही लोकांच्या आवडीची गोष्ट आहे़
अमेरिकेतील स्टॅच्यू आॅफ लिबर्टीपेक्षा मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रामध्ये उभारण्याची काय गरज आहे, असा सवाल राज यांनी केला. डोंगर पोखरले जात आहेत़ प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे़ गडकिल्ले कायम तसेच राहतील यासाठी काय करता येईल ते पाहावे़, असे ते म्हणाले.
बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘शिवाजी’ या तीन अक्षरांसाठी संपूर्ण हयात खर्च केली़ शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांत पोहोचवला, पण त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याचे वाटेल तसेच राजकारण केले़ शिवाजी महाराज गेले नसतील, त्यापेक्षा अधिक वेळा एऩ के. महाजन हे सिंहगडावर गेले आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले़
शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करावा़ मतभेद असतील तर ते व्यक्त करावेत़ प्रखर टीका करावी़ पण गडकिल्ले आणि शिवाजी महाराजांची चेष्टा करू नये, असे पुरंदरे यांनी सांगितले़ गडकिल्ल्यांवर गेल्याने स्फूर्ती आणि ऊर्जा मिळते़ मी तरुणांना किल्ल्यांवर घेऊन जातो़ हे तरुण माझी स्फूर्ती आहेत.गडकिल्ले चढण्यात जो आनंद आहे़ तो बाजारात विकत मिळणार नाही, असे महाजन यांनी सांगितले़ पुरंदरे आणि महाजन यांच्या कार्यामध्ये साथ देणारे त्यांचे सहकारी प्रतापराव टिपरे, शैलेश वरखडे, ज्ञानेश्वर जाधव, मकरंद कोलटकर, शरदचंद्र टिळे यांचाही सन्मान करण्यात आला़ (प्रतिनिधी)