मार्ड करणार सरकारचा निषेध
By Admin | Published: December 26, 2015 01:59 AM2015-12-26T01:59:31+5:302015-12-26T01:59:31+5:30
बारावीनंतर एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी साडेपाच वर्षे अभ्यास करावा लागतो. त्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप असते. पण, आता इंटर्नशिपनंतर सात वर्षे गावात प्रॅक्टिस करावी
मुंबई : बारावीनंतर एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी साडेपाच वर्षे अभ्यास करावा लागतो. त्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप असते. पण, आता इंटर्नशिपनंतर सात वर्षे गावात प्रॅक्टिस करावी, असा बॉण्ड करण्याच्या विचारात सरकार आहे. असे झाल्यास डॉक्टरांचे नुकसान होईल म्हणून मार्डने याचा विरोध केला आहे.
निवासी डॉक्टरांचे अनेक प्रश्न आहेत. पण, ते प्रश्न सोडवण्याचे सरकार आश्वासन देते. पूर्ण करत नाही. त्यात सात वर्षांचा बॉण्ड केल्यास हा डॉक्टरांसाठी जाचक ठरणार आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व निवासी डॉक्टर शनिवार, २६ डिसेंबर रोजी काळ्या फिती बांधून काम करणार आहेत. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यावर अनेक डॉक्टर एक वर्षाचा बॉण्ड पूर्ण करून पदव्युत्तर शिक्षण घेतात. पण, सात वर्षे गावात जाऊन प्रॅक्टिस केल्यास पदव्युत्तर शिक्षण घेणे त्यांना कठीण होईल. म्हणून मार्ड याला विरोध करीत असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.