विधिमंडळ अधिवेशनात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:40 AM2018-06-25T02:40:16+5:302018-06-25T02:40:21+5:30
नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने घेतला आहे
मुंबई : नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने घेतला आहे. शनिवारी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाºयांची बैठक परळ येथे झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. माहुल रिफायनरी प्रकल्पग्रस्तांची संघटनेच्या पदाधिकाºयांनी भेट घेतली व त्यांचा लढा पुढे नेण्याची ग्वाही त्यांना दिली आहे.
कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्यासहित नितीन जठार, श्रीकांत कुवरे व इतर पदाधिकाºयांनी माहुल येथे भेट देऊन, प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या समस्या जाणून घेतल्या.
माहुल येथील नागरिकांचा लढा पुढे नेण्यासाठी १५ दिवसांमध्ये पुन्हा येऊन बैठक घेऊन, आंदोलनाची दिशा ठरविण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. माहुल येथे या प्रकल्पामुळे अनेकांना त्वचारोग, सांधेदुखी, कर्करोग, दमा, श्वसनाचे विकार झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी माहुल येथे भेट द्यावी व ही परिस्थिती पाहून नाणारबाबत निर्णय घ्यावा, असे वालम म्हणाले.
नाणार येथील प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात सरकारवर दबाव वाढविण्यासाठी नागपूर अधिवेशन काळात ११ जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हा विषय सभागृहात यावा व सभागृहाचे कामकाज प्रभावित करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांशी संपर्क साधण्यात येत आहे, असेही वालम म्हणाले. या बैठकीला वालम यांच्यासहित गाव समितीचे नंदू कुलकर्णी व इतर उपस्थित होते.