मोहरा सदावर्ते असले तरीही सूत्रधार नागपुरात बसलेले असू शकतात; मिटकरींचा रोख कोणाकडे?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 08:22 AM2022-04-09T08:22:26+5:302022-04-09T08:23:03+5:30
सदावर्तेंचं चिथावणीखोर भाषण, ते मोहरे, पण मास्टरमाईंड नागपुरातले असू शकतात; मिटकरींचा दावा
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल केला. जवळपास १५० ते २०० कर्मचारी पवारांच्या घराजवळ पोहोचले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या हल्ल्याचा मोहरा वकील गुणरत्न सदावर्ते असले तरीही त्याचे मास्टरमाईंड नागपुरात बसलेले असू शकतात, असा संशय मिटकरींनी बोलून दाखवला.
आझाद मैदानातील मूठभर लोकांना हाताशी धरून चप्पल आणि दगड भिरकावण्यात आले. सदावर्ते या हल्ल्याचा मोहरा आहेत. सदावर्ते काल एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात नाचत होते. त्यांनी काल दिलेलं भाषणही चिथावणीखोर होतं, असं मिटकरींनी म्हटलं. मोहरा सदावर्ते असेल तरीही या सगळ्यामागचे सूत्रधार नागपुरात बसलेले असू शकतात. त्याला शोधावं लागेल, असं मिटकरी म्हणाले.
आझाद मैदानातील आंदोलकांना हुसकावलं
आझाद मैदान येथील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत त्यांना बाहेर काढलं असून यामधील ५ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्थानकात घोषणाबाजी सुरू केली आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावरून गेल्या पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचं आझाद मैदान येथे आंदोलन सुरू होतं.
एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केल्यानंतर मुंबई पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदान रिकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी बाहेर निघण्यास नकार दिला होता. वकील गुणरत्न सदावर्ते सांगतील तोपर्यंत आम्ही बाहेर जाणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली होती. मात्र मध्यरात्री पोलिसांनी कारवाई करत २५० कर्मचाऱ्यांना बाहेर काढले असून यामधील ५ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आझाद मैदानातून बाहेर काढल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात बसून ठिय्या देण्यास सुरुवात केली आहे.