'आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, उद्यापर्यंत वाट पाहून कठोर निर्णय घेणार'; अनिल परब यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 03:09 PM2021-11-25T15:09:15+5:302021-11-25T15:16:15+5:30

'कर्मचाऱ्यांची पगारवाढीची मागणी आम्ही मान्य केली, आता संप करुन जनतेला वेठीस धरू नका.'

'Protesters should not stretch to the breaking point, we will wait till tomorrow and will take tough decision'; Anil Parab's warning | 'आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, उद्यापर्यंत वाट पाहून कठोर निर्णय घेणार'; अनिल परब यांचा इशारा

'आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, उद्यापर्यंत वाट पाहून कठोर निर्णय घेणार'; अनिल परब यांचा इशारा

Next

मुंबईः मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील एसटी कामगारांचा संप(ST Strike) आज संपणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, आंदोलनाचे नेतृत्व आपल्या हातात घेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी विलीनीकरण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा गुरुवारी दिला आहे. यानंतर आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी कठोर भूमिका घेतल्याचा पाहायला मिळत आहे.

राज्य सरकारने बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ केली. पण, अॅड. सदावर्ते यांनी विलिनीकरण होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधाना अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. 'आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये. एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर कठोर निर्णय घेऊ', असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी दिला.

...तर कठोर कारवाई केली जाणार
आंदोलनाबाबत बोलताना अनिल परब म्हणाले की, 'राज्य सरकारने आपली भूमिका कालच स्पष्ट केली आहे. आम्ही आमचा लेखाजोखा मांडला आहे. मागन्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते, पण काही कारणास्तव ते येत नाहीयेत. आम्ही आता उद्या सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर कठोर निर्णय घेऊ. जे कर्मचारी संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल', असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

जनतेला वेठीस धरू नका
परब पुढे म्हणाले की, आम्ही पगारवाढीची मागणी मान्य केली आहे. त्यांच्या इतरही काही मागण्या असतील तर त्यांनी समितीसमोर मांडव्यात. विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालय जो निर्णय देईन, तो आम्हाला मान्य असणार आहे. आता कर्मचाऱ्यांनी संप करुन जनतेला वेठीस धरू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

विलीनीकरण होईपर्यंत संप सुरूच -ॲड. सदावर्ते
जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कोणताही कर्मचारी कामावर जाणार नाही, असे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले आहे. आज राज्य सरकारने तुटपुंजी वेतनवाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीची नाही, तर विलीनीकरणाची मागणी केली होती. वेतनवाढ दिली तरी संप मागे घेतला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोडाफोडीचे राजकारण केले आहे. या बोटावरील थुंकी त्या बोटावर केली आहे. भावाभावांत भांडण लावणारे तुम्ही शरद पवार आहात. तुम्ही आमच्यात फूट पाडली आहे, जो निर्णय झाला ती एक फसवणूक आहे, असंहे सदावर्ते म्हणाले. 

एसटीच्या संपातून खोत-पडळकरांची माघार
एसटी कामगारांचं आंदोलन आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं म्हणत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. आहे. एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आलं आहे. आता पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा असंही खोत यांनी म्हटलं. यावेळी गोपीचंद पडळकरदेखील त्यांच्यासोबत होते. यावेळी त्या दोघांनीही आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा केली. एसटी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनात आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी उतरलो होतो असं सदाभाऊ खोत म्हणाले. 
 

Read in English

Web Title: 'Protesters should not stretch to the breaking point, we will wait till tomorrow and will take tough decision'; Anil Parab's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.