महापुरुषांची बदनामी करणाऱ्या विकृत मनोवृत्तीचा संमेलनात निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 01:43 PM2022-04-25T13:43:08+5:302022-04-25T13:43:22+5:30
साहित्य संमेलनात १८ ठराव मंजूर : गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा
राम शिनगारे
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी
उदगीर (जि. लातूर) : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, मातोश्री जिजाबाई आणि शाहू महाराज यांच्याविषयी बदनामीपर लेखन करणारे, व्यक्तिगत पातळीवर सभा-संमेलनात जाहीरपणे विकृत बुद्धीने बोलणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींचा तीव्र निषेध करीत असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मागील काळात राज्यपालांसह इतरांनी महापुरुषांवर टिप्पणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा ठराव घेण्यात आला.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो यांच्यासमोरच मराठी भाषेची गोव्यात होत असलेली गळचेपी चिंताजनक असल्याचे सांगितले होते. यानंतर ठाले-पाटील यांनी समारोपात गोव्यात मराठी भाषिकांची संख्या अधिक असतानाही कोकणी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. हा मराठी भाषिकांवरील अन्याय असून, तो गोवा सरकारने दूर करीत मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करणारा ठराव मांडला. त्यास बहुमताने मंजुरी देण्यात आली. हा ठराव गोवा शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
साहित्य संमेलनात एकूण १८ ठराव मंजूर केले. त्यात केंद्र शासनाने मराठी भाषेला तत्काळ अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, सीमाभागातील मराठी शाळा व महाविद्यालयांना महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत करावी, कर्नाटकात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, गळचेपीचा निषेध, बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषेसाठी स्वतंत्र मराठी विभाग स्थापन करावा, गोव्यात पणजीत अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्राचे पुनरुज्जीवन करावे आदी १८ ठराव मंजूर केले आहेत.
जेम्स लेनचा जाहीर निषेध
ब्रिटिश लेखक जेम्स लेन याने ‘शिवाजी हिंदू किंग इन मुस्लीम इंडिया’ या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजामाता यांचा दुष्ट हेतूने अवमान केला. समस्त देशाला वंदनीय महापुरुषांवर हेतुतः बदनामीकारक लेखन करून समाजात असंतोष निर्माण केला. जेम्स लेनसह अशा तत्सम कुप्रवृत्तीच्या निषेधाचा ठराव महामंडळाचे डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी मांडला.
उदगीर जिल्ह्याची निर्मिती करा
उदगीरची लोकसंख्या दीड लाख असून, शहरात बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, जिल्ह्याची उपविभागीय कार्यालये असल्यामुळे जिल्हा करावा, उदगीर परिसरातील देवणी वळू देशभर परिचित असल्यामुळे येथे पशुवैद्यकीय विद्यापीठाची स्थापन करावी, उदगीर किल्ल्यास ‘अ’ दर्जा देण्याची मागणी करणारे ठराव मंजूर करण्यात आले.